राज्यभरातील तपासणीत दुधात पाण्याची भेसळ, युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, फॉर्मालिन, मेलामाइनसारख्या घातक रसायनांचा वापर, विनापरवाना व्यवसाय, चुकीचे लेबलिंग, शीतसाखळीतील त्रुटी आणि अस्वच्छ प्रक्रियेचे प्रकार आढळून आले आहेत.
यामुळे संपूर्ण दूधपुरवठा साखळीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाने कठोर नियम लागू केले आहेत. नियमाचे उल्लंघन आणि भेसळखोरी करणाऱ्यांना आता दहा लाखांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षाही होऊ शकणार आहे.
दुधाची मागणी अधिक आहे. त्या तुलनेत उत्पादन कमी आहे. अशा स्थितीत भेसळखोरीला ऊत आला आहे. ग्रामीण भागात गायी, म्हशी असलेल्या घरी दुधाची विक्री होते. त्यामुळे ते दूध शूद्ध आणि पौष्टिक आहे, याची खात्री पटते.
परंतु, पाकीटबंद दुधाची विश्वातहर्ता नेमकी किती, असा प्रश्न ग्राहकांना पडतो. मात्र दुधाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यामुळे ग्राहकांना पाकीटबंद दूध खरेदीशिवाय पर्याय राहिला नाही.
आयएएस तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर भेसळखोरीचा रोज एक नवा पर्दाफाश होत आहे.
एफडीएची विशेष मोहीम
जनतेला शुद्ध, सकस आणि सुरक्षित दूध मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ‘स्वच्छ दूध-सुरक्षित आरोग्य-भेसळमुक्त महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. दुधातील कृत्रिम आणि रासायनिक भेसळीविरुद्ध प्रशासनाने ‘झीरो टॉलरन्स’ (कोणतीही गय न करण्याचे) धोरण स्वीकारले आहे.
मानकांची अंमलबजावणी
दूध संकलन केंद्र, बल्क मिल्क कूलर, चिलिंग सेंटर, डेअरी, प्रक्रिया उद्योग, वाहतूकदार, वितरक आणि किरकोळ विक्रेते या संपूर्ण पुरवठा साखळीला समान पद्धत लागू केली आहे. कच्च्या दुधासाठी रॉ मिल्कचे लेबलिंग अनिवार्य राहील. पिण्यापूर्वी उकळणे गरजेचे आहे.
ही भांडीच वापरावी
पाश्चराइज्ड, प्रमाणित किंवा इतर कोणत्याही उष्णताप्रक्रिया केलेल्या दुधाची विक्री केवळ सीलबंद आणि सुरक्षित लेबलयुक्त पॅकेजिंगमध्येच करता येईल. दुधाचे संकलन, साठवणूक आणि वाहतूक करताना केवळ फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा व उपकरणांचा वापर बंधनकारक आहे.
उत्पादन, विक्रीचे रेकॉर्ड हवे
दुधाच उत्पादन कथी झाले, ते कोठून गोळा केले आणि कधी विकले गेले, या संदर्भातील सर्व माहिती व रेकॉर्ड संकलित करून ठेवणे व्यवसायांना बंधनकारक असेल. दूध काढल्यापासून किंवा संकलित केल्यापासून दोन तासांच्या आत ते शीतगृहात आणून त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
तंदुरुस्तीचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य
दुग्ध व्यवसायात दुधाला थेट हाताळणाऱ्या प्रत्येक कामगाराकडे अधिकृत वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रत्येक डेअरी आणि प्रक्रिया केंद्राला अन्न सुरक्षा मानकांचे व गुणवत्ता नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःची अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली राबवावी लागेल, असे आदेश दिले आहेत.












