यावल पोलिसांची कारवाई; गावठी पिस्तूल, मॅगझीन व जिवंत काडतूस जप्त
यावल : तालुक्यातील डांभुर्णी येथे भर चौकात गावठी पिस्तूलातून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचाला यावल पोलिसांनी अवघ्या काही तासांत जळगाव येथून ताब्यात घेत अटक केली. विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७, रा. कोळन्हावी, ता. यावल) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२७ ऑगस्ट) रात्री सुमारे आठ वाजता डांभुर्णी गावातील चौकात विकास सोळंके याने गावठी कट्ट्यातून हवेत फायर केल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळाची पाहणी केली असता किनगाव रोडलगत असलेल्या शिवसम्राट सोयाबीन बिर्याणी दुकानाजवळ गोळीबारानंतरची रिकामी पुंगळी आढळून आली. परिसरातील दुकानदारांकडे चौकशी केली असता हा गोळीबार विकास सोळंके याने केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली. त्यानंतर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक पथकाने रिकामी पुंगळी तसेच अन्य भौतिक पुरावे जप्त केले.
जळगावमध्ये मध्यरात्री अटक
गोळीबार केल्यानंतर संशयित जळगावच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन व पोलीस कर्मचारी सचिन पाटील यांना जळगाव येथे रवाना करण्यात आले. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या पथकानेही शोधमोहीम सुरू केली.
संयुक्त शोधमोहीमेदरम्यान रात्री सुमारे एक वाजता जळगाव शहरातील कालंका माता मंदिर परिसरातून विकास उर्फ गोटू सोळंके याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला यावल पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, सोळंके हा कोळन्हावी ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच असून त्याच्याशी संबंधित आदर्श हॉटेल, बीअर बार व परमिट रूम असल्याचे तपासात समोर आले आहे. डांभुर्णी येथील काही तरुण त्याच्या हॉटेलमध्ये येऊन मोबाईलवर व्हिडिओ काढत असल्याने त्यांच्याशी पूर्वीपासून वाद असल्याचे सांगण्यात आले आहे. २६ ऑगस्ट रोजी या तरुणांसोबत त्याचे भांडण झाले होते.
यानंतर संबंधित तरुणांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दुसऱ्याच दिवशी डांभुर्णी येथे येऊन हवेत गोळीबार केल्याची कबुली संशयिताने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
शेतातून पिस्तूल जप्त
गोळीबारासाठी वापरलेले गावठी पिस्तूल कोळन्हावी गावाच्या शिवारातील आदर्श हॉटेलजवळील स्वतःच्या शेतात लपवून ठेवल्याचे संशयिताने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत राऊंड असा मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५ तसेच भारतीय हत्यार कायद्यातील कलम ३(१), २५(१-ब), ५(१), २५(१)(अ), २५(९), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत यावल पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.












