जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकारणात गतीमान हालचाली

0
57

जळगाव जिल्ह्यातील राजकारणात गतीमान हालचाली होत आहेत. सहा महिन्यापूर्वी जळगाव महानगरपालिकेत सत्तांतर होवून भाजपला धक्का देवून शिवसेनेने भगवा फडकवला. महापौर-उपमहापौर हे शिवसेनेचे आरुढ झाले. आता गटनेते पदाच्या निवडीवरून भाजप-शिवसेनेत वाद निर्माण होवून अखेर महासभा तहकूब करण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवली. भाजपच्या काही फुटीर बंडखोर नगरसेवकांची घरवापसी झाल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे यांनी केला. त्यामुळे महानगरपालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

दुसरीकडे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेल बनविण्याच्या हालचालींना चांगलाच वेग आला असतांना सर्व पक्षीय पॅनेलच्या फॉर्म्युला ठरला गेला. तो फॉर्म्युला चारही पक्षांनी मान्य केला आणि काल अचानक काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरुन भाजप सोबत राजकारणात सलगी करायची नाही असा तत्विक निर्णय जाहीर करून सर्वपक्षीय पॅनेलमधून काँग्रेसने फारकत घेतली. त्यामुळे जिल्हा बँकेत आता सर्वपक्षीय पॅनलचे स्वप्न भंगणार आहे हे जवळ जवळ निश्चित झाले आहे.

जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असल्याने शेतकऱ्यांचे हित साधायचे असेल तर सहकारात राजकारण नको. जिल्हा सह.बँकेत शेतकऱ्यांच्या हितासाठी पक्षाचे जोडे बाहेर काढून एकत्र यायला हवे. असे सर्वच पक्षाचे नेते म्हटले असतांना त्यात माशी शिंकली. जिल्हा बँकेत सर्वपक्षीय पॅनेल होणे नाही. काँग्रेस बरोबरच आता भाजपचे आ. गिरीश महाजन म्हणताय की, जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. एवढ्या वरच ते थांबले नाही तर महानगरपालिकेत भाजपच्या नगरसेवकात झालेल्या फाटाफुटीमुळे संत्तातर होवून शिवसेनेने सत्ता स्थापन केली आता भाजपचे 12 बंडखोर नगरसेवक पुन्हा भाजपत आले असून आणखी काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याने येत्या दसरा – दिवाळीनंतर जळगाव महानगरपालिकेत संत्तातर होवून पुन्हा भाजप सत्तेवर येईल असे आ.गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात गतीमान हालचाली होत आहेत.

जळगाव महानगरपालिका आणि जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेचा दोन महत्वाच्या संस्थावर ताबा मिळविण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. परंतु राजकारणाच्या या हालचालीमुळे जिल्ह्याच्या विकासावर विपरीत परिणाम होणार हे मात्र निश्चित होय.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकी संदर्भात सर्वपक्षीय पॅनेलचे सर्वकाही सुरळीत सुरु असतांना अचानक काँग्रेसने सर्वपक्षीय पॅनेलमधून बाहेर पडण्याचे कारण काय? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेण्याचे खरे कारण काय? या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यामागचे कारण वेगळेच असल्याचे दिसून येते. जिल्हा बँकेच्या एकूण 29 जागांपैकी सर्वपक्षीय पॅनेलचा जो फॉर्म्युला ठरला होता. त्यात भाजप – 7, राष्ट्रवादी -7, शिवसेना- 5, काँग्रेसला- 2 जागा ठरल्या होत्या. यामध्ये काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाला फक्त 2 जागा आणि शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाला 5 जागा, राष्ट्रवादीला 7 जागा मिळाल्यामुळे काँग्रेससारख्या पक्षाची नामुष्कीच म्हणता येईल. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने धोरणात्मक निर्णय घेण्याचा बहाणा केला आणि भाजप बरोबर राजकारणात सहभागी व्हायचे नाही असा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे जाहीर करून आपल्या पक्षाची होणाऱ्या नामुष्कीवर धोरणात्मक निर्णयाचा पडदा टाकला. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या संघटनेत मोठे बळ प्राप्त होईल असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे.

जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडे कार्यकर्त्यांपेक्षा जास्त नेतेच आहेत. त्यामुळे दलित आदिवासी, मुस्लिम, मागासवर्गीय समाज जी काँग्रेसची व्होटबँक आहे. त्या समाजात कार्य करणारे कार्यकर्तेच नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील खिळखिळे झालेली काँग्रेस संघटन मजबूत करायचे असेल तर जनतेमध्ये काँग्रेस पक्षांची पाळेमुळे रुजली पाहिजेत.ज्या समाजाचा कोणी वाली नाही त्यांचा वाली काँग्रेस पक्ष झाला पाहिजे. जिल्ह्यात एकमेव काँग्रेसचे आमदार निवडून आलेले आहेत. रावेर मतदार संघातून निवडून आलेले काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्या विजयात आ.शिरीष चौधरी यांच्या कार्याचा मोठा वाटा आहे. रावेर-यावल तालुक्यात आ.शिरीष चौधरी यांचे कार्य आहे. या दोन्ही तालुक्यातील जनतेची त्यांची नाळ जुळलेली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयात काँग्रेसचे फार मोठे योगदान आहे असे म्हणता येणार नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाला जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

जिल्ह्यात काँग्रेसला पूर्ववैभव प्राप्त करणे हे कठीण काम आहे. कारण भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संघटन काँग्रेस पेक्षा मजबूत आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धोरणात्मक निर्णय होवून भाजपबरोबर राजकारण करणार नाही. म्हणून सर्व पक्षीय पॅनेलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणे हे तत्वाच्या दृष्टीने योग्य असले तर पक्ष संघटनेच्या दृष्टीने तो आत्मघातकी निर्णय आहे यात वाद नाही. असो जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात गतीमान होणाऱ्या हालचालीचा फायदा काँग्रेसला कितपत मिळेल हे येणारा काळच ठरवेल.

Spread the love