SRI, जनगणना आणि शासकीय कामांमध्ये अधिकारी व्यस्त असताना निवडणूक कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह
प्रतिनिधी | जळगाव
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यावर अनेक स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी १५ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
आदेशानुसार १५ एप्रिल २०२६ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असून २४ जुलै २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर २४ जुलै ते २९ जुलै २०२६ या अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. तसेच ४ ऑगस्ट २०२६ पर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मात्र, या संपूर्ण प्रक्रियेबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. सध्या राज्यभर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SRI) कार्यक्रम सुरू असून शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर मोठ्या प्रमाणात अतिरिक्त जबाबदाऱ्या आहेत. शिक्षक निवडणूक प्रक्रियेत गुंतल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामसेवक निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिल्यास ग्रामपंचायतींच्या दैनंदिन प्रशासनावर परिणाम होऊ शकतो. तसेच अंगणवाडी यंत्रणा निवडणूक कामात गुंतल्यास बालकांच्या सेवा व पोषण कार्यक्रमांवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय राज्यात जनगणनेचे कामही सुरू असून तलाठी, ग्रामसेवक आणि इतर महसूल व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी या प्रक्रियेत कार्यरत आहेत. त्यामुळे नियमित शासकीय कामकाजावर आधीच ताण निर्माण झाला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाला पाठविण्यात आलेल्या पत्रातही याच मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. पत्रानुसार भारत निवडणूक आयोगाने विधानसभा मतदारसंघांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला असून अंतिम मतदार यादी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होणार आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकांसाठी स्वतंत्रपणे मतदार यादी तयार करण्याऐवजी विधानसभा मतदार यादी अंतिम झाल्यानंतर तीच अधिक अचूक आणि दोषरहित यादी वापरण्याची सूचना करण्यात आली आहे.
संबंधित पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी राबविल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडेल. तसेच अंतिम विधानसभा मतदार यादी उपलब्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अधिक अचूक मतदार यादी तयार करणे शक्य होईल.
यामुळे आता सर्वसामान्य नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यात एकच प्रश्न चर्चिला जात आहे —
“SRI, जनगणना आणि इतर शासकीय कामांचा ताण असताना ग्रामपंचायत मतदार यादी तयार करण्याची इतकी घाई का?”
निवडणूक आयोग याबाबत कोणता निर्णय घेतो आणि संबंधित कार्यक्रमात बदल होतो का, याकडे राज्यभरातील ग्रामपंचायतींचे लक्ष लागले आहे.












