नशिराबाद शिवारात मानवी कवटी आढळल्याने खळबळ

0
2

फॉरेन्सिक तपासासाठी नमुने नाशिक व धुळे येथे रवाना

प्रतिनिधी / भुसावळ : भुसावळ तालुक्यातील नशिराबाद येथील महालक्ष्मी चौफुलीजवळील शिवारात मानवी कवटी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना डॉ. दिलीप चौधरी (रा. मुंबई) यांच्या मालकीच्या गट क्रमांक ९८५ मधील पडीक शेतात उघडकीस आली. माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून संबंधित कवटी फॉरेन्सिक तपासणीसाठी नाशिक व धुळे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद पाटील यांनी नशिराबाद पोलीस ठाण्याला मानवी कवटी आढळल्याची माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी संपूर्ण शेताची पाहणी करून परिसराची कसून तपासणी केली. कवटी आढळलेल्या ठिकाणासह आजूबाजूच्या परिसरात इतर मानवी अवशेष, हाडे किंवा संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्यात आला. मात्र, प्राथमिक तपासात कवटी व्यतिरिक्त अन्य कोणतेही मानवी अवशेष आढळून आले नाहीत.

पोलिसांनी पंचनामा करून कवटी ताब्यात घेतली असून तिचे नमुने पुढील वैज्ञानिक तपासासाठी नाशिक व धुळे येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविले आहेत. फॉरेन्सिक अहवालानंतरच कवटी किती जुनी आहे, ती पुरुषाची की महिलेची आहे आणि तिची ओळख पटविण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येणार आहे.

दरम्यान, संबंधित शेत अनेक वर्षांपासून पडीक असून तेथे मोठ्या प्रमाणावर बाभळीची झाडे व दाट झाडी वाढली आहे. त्यामुळे या परिसरात विविध बेकायदेशीर हालचाली होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी शेतातील दाट झाडी हटविण्याची मागणी केली आहे.

या कवटीचा नेमका उगम काय, ती त्या ठिकाणी कशी आली, संबंधित व्यक्तीसोबत काय घडले आणि हा प्रकार किती जुना आहे, याबाबत अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्यामुळे परिसरात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे म्हणाल्या,

“घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपासाला अधिक वेग दिला जाईल.”

या प्रकरणाचा पुढील तपास नशिराबाद पोलीस करीत आहेत.

— जितेंद्र काटे, प्रतिनिधी, भुसावळ

जळगाव संदेश 📰

Spread the love