प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण आणि ‘SIR’ (बूथ सक्षमीकरण) उपक्रमांतर्गत भुसावळ तालुक्यातील ‘किन्ही’ गावाने ग्रामीण भागामध्ये अत्यंत गौरवशाली कामगिरी केली आहे. किन्ही गावाने संपूर्ण भुसावळ तालुक्यात ग्रामीण भागामध्ये सर्वात आधी १००% काम पूर्ण करून ‘पहिला क्रमांक’ पटकावला आहे!
गावातील तिन्ही यादी भागांचे (बूथ) संपूर्ण डिजिटल मॅपिंग, प्रपत्र (फॉर्म) भरणे आणि ते निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर यशस्वीरीत्या अपलोड करण्याचे काम १००% फत्ते झाले आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल भुसावळचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय ना. श्री. संजयभाऊ सावकारे यांनी तिन्ही कर्तव्यदक्ष बीएलओ (BLO) कर्मचाऱ्यांचे दूरध्वनीवरून विशेष कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
‘किन्ही’ गावाचा यादीनिहाय अचूक ताळेबंद:–
किन्ही गावातील तीनही बूथ प्रमुखांनी अहोरात्र मेहनत घेऊन आपापल्या भागातील लोकसंख्येचे अचूक पुनरीक्षण पूर्ण केले आहे.
यादी भाग क्रमांक २६३: एकूण ९५२ लोकसंख्येचे अचूक मॅपिंग करत बीएलओ श्री. ओंकार एकनाथ पाटील यांनी आपले बूथ १००% पूर्ण केले.
यादी भाग क्रमांक २६४: एकूण ८५९ लोकसंख्येचे काम वेळेच्या आत पूर्ण करून बीएलओ श्री. गिरीश ज्ञानदेव चौधरी यांनी आपले कर्तव्य चोख बजावले.
यादी भाग क्रमांक २६५: एकूण ८९९ लोकसंख्येच्या यादीचे संपूर्ण काम अत्यंत तांत्रिक अचूकतेने पूर्ण करत बीएलओ श्री. रुपेश सुनील नेहेते यांनी आपले बूथ अव्वल स्थानी आणले.
तिन्ही यादी भागांची मिळून एकूण २,७१० लोकसंख्येचे गृहभेटींद्वारे पडताळणी, अनमॅप मतदारांचे पुनरीक्षण आणि नवीन मतदार नोंदणीचे काम या तिन्ही सहकाऱ्यांनी अत्यंत कल्पकतेने पूर्ण केले आहे
किन्ही गावाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा! – ना. संजयभाऊ सावकारे
‘किन्ही’ गावाने संपूर्ण तालुक्यात ग्रामीण भागातून मारलेली ही बाजी पाहून मंत्री ना. संजयजी सावकारे कमालीचे भारावून गेले. त्यांनी बीएलओंचे अभिनंदन करताना सांगितले की, “किन्ही गावातील ओंकार पाटील, गिरीश चौधरी आणि रुपेश नेहेते या तिन्ही बीएलओ बांधवांनी रात्रंदिवस एक करून हे राष्ट्रीय कार्य वेळेच्या आधी पूर्ण केले आहे. तालुक्यातील इतर सर्व ग्रामीण भागातील बूथ प्रमुख आणि बीएलओ कर्मचाऱ्यांनी किन्ही गावाचा हा यशस्वी पॅटर्न आदर्श मानून आपापले काम लवकरात लवकर १००% पूर्ण करावे.”
लोकशाही बळकट करणाऱ्या या तिन्ही बीएलओ महाभागांचे आणि त्यांना मोलाचे सहकार्य करणाऱ्या किन्ही येथील सरपंच सौ.नीलमताई सोनवणे यांचे पती सचिन दादा सोनवणे तसेच ग्रामपंचायत सदस्य दिलीप कडू सुरवाडे,शक्ती केंद्रप्रमुख कृणाल येवले, किन्ही गावचे पोलीस पाटील राजू तायडे सोबत समस्त गावकऱ्यांनी एकमताने या कामात मदत केली. ‘किन्ही’ ग्रामस्थांचे भुसावळ तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे!












