‘ विश्व बौद्ध संघ ‘ स्थापना दिवस ( २५ मे १९५० )

0
3

‘पाली भाषेचे विद्वान , विविध देशांमध्ये श्रीलंकेचे राजदूत म्हणून काम करणारे , विविध बौद्ध ग्रंथांचे लेखक , प्रा. डॉ. गुणापाला पियासेना मलालसेकेरा यांनी दिनांक २५ मे १९५० रोजी श्रीलंकेत ‘ जागतिक बौद्ध धर्म परिषद ‘ आयोजित केली होती . या परिषदेस आशिया , युरोप , अमेरिका खंडातील १२९ देशांचे प्रतिनिधी निमंत्रित करण्यात आले होते . कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा या परिषदेतर्फे निमंत्रित करण्यात आले होते . थेरवाद , महायान , वज्रयान अश्या विविध विचारधारेच्या प्रमुखांना या परिषदेला बोलावले होते . बौद्ध धर्मातील विविध विचारधारेचे प्रमुख या दिवशी प्रथमच एका मंचावर आले होते . हे या परिषदेचे सर्वात मोठे यश होते.

या परिषदेला येणाऱ्या सर्व निमंत्रितांचे सिलोनचे राष्ट्रपिता तथा पहिले प्रधानमंत्री डी. एस. सेनानायके यांनी कोलंबो रेसकोर्सवर स्वागत केले . या परिषदेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर , माई आंबेडकर , पां. ना. राजभोज हजर होते. या परिषदेत सी. बी. नुगावाला यांनी विश्व बौद्ध संघ स्थापन करण्याचा ठराव मांडला . या ठरावास इंग्लंडच्या कु. लाऊंसबरी , ब्रम्हदेशाचे यू चान चन , बंगालचे डॉ. अरविंद बरूआ , जपानचे रिरी नाकायमा, इटलीचे लोकनायक , थायलंडचे सुखित निमहेंद्र यांनी अनुमोदन दिले . यात विश्व बौद्ध संघाचे उद्दिष्टे वाचून दाखविली . त्यात प्रामुख्याने १) बुद्ध विचारांचे काटेकोर पालन करणे , २) बौद्ध धर्मीयांमध्ये एकता व बंधुभाव निर्माण करणे , ३) बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार , प्रसार करणे , ४) सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे , ५) जगभरात सुख , शांती , मानवता निर्माण करण्या करिता कार्य करणे . इ. उद्दिष्टांचा समावेश आहे . या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून गुनापाला पियासेना मलालसेकेरा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली .

ही संस्था सध्या ३५ देशांमध्ये कार्यरत आहे . मुख्यालय थायलंड येथे आहे . संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक , सामाजिक परिषदेची अशासकीय संस्था ( एन.जी.ओ.) म्हणून संलग्न आहे . युनेस्को सोबत सहभाग आहे . १९९९ पासून या संस्थेचे अध्यक्ष थायलंडचे प्रसिद्ध राजकीय नेते तथा दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघाचे सहा वर्षे महासचिव राहीलेले , थायलंड रेड क्रॉस सोसायटीचे महासचिव म्हणून सहा वर्षे राहीलेले फान वन्नामेथी आहेत . ते सध्या १२३ वर्षाचे आहेत मात्र अजूनही ते विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात . ( खरेतर हे सुद्धा या संस्थेचे मोठे यश म्हणावे लागेल ) चीनचे हिंग युन हे मानद अध्यक्ष आहेत .

२५ मे १९५० ला संपन्न झालेल्या या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या परिषदेचे खालील मुद्यांवर लक्ष वेधले .

१) बौद्ध धर्माचे आचार व विचार भारतात पाहावयास मिळत नाही . ते पाहण्याची संधी साधावी .

२) बौद्ध धर्माच्या मूळ तत्त्वाशी विसंगत अश्या श्रध्दांनी बौद्ध धर्मीय लोक कितपत ग्रासले आहेत व मूळ शुद्ध स्वरूपात तो धर्म कितपत राहिला आहे हे पहावे.

३) जग सिलोनला बौद्धधर्मी म्हणते म्हणून सिलोन बौद्धधर्मानुयाई आहे की तो धर्म आजही जिवंत स्वरूपात येथे नांदत आहे याचा शोध घ्यावा .

बाबासाहेबांनी मांडलेले हे मुद्दे आज बौद्ध धर्माच्या प्रचार , प्रसार करणाऱ्या सर्वच संघटनांना मार्गदर्शक आहेत . या मुद्यांवर भारतात काम करणे खूपच गरजेचे झाले आहे .

 

Spread the love