45 अंश तापमानात दुपारची वीजपुरवठा वेळ; शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं ?

0
15

जळगाव : राज्यात तापमानाचा पारा 45 अंशांच्या पुढे गेला असताना देखील महावितरण कंपनीकडून शेतीपंपासाठी दुपारच्या भर उन्हात वीजपुरवठा करण्यात येत असल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास शेतीपंपाची लाईट दिली जात असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे.

एकीकडे शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे एवढ्या प्रचंड उष्णतेमध्ये पिकांना पाणी भरण्यासाठी शेतात जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सध्या अनेक भागांमध्ये उन्हाळी कापूस लागवडीला सुरुवात झाली असून, काही शेतकऱ्यांची लागवड 10 मे रोजीच पूर्ण झाली आहे. मात्र वेळेवर पाणी न मिळाल्यास कापसाच्या बियाण्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, एवढ्या वाढत्या तापमानामध्ये दुपारी शेतात काम करणे अत्यंत कठीण बनले असून उष्माघाताचा धोका देखील वाढला आहे. “शेतकऱ्याने जगायचं की मरायचं?” असा संतप्त सवाल आता शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, अधिकारी वर्ग वातानुकूलित कार्यालयांमध्ये बसून निर्णय घेत असल्याची टीका देखील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. “एक दिवस तरी अधिकाऱ्यांनी दोन तास शेतकऱ्यांसोबत उन्हात उभं राहावं, तेव्हा शेतकऱ्यांच्या वेदना समजतील,” अशा भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

मायबाप प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शेतीपंपासाठी रात्रीची किंवा सकाळची वीजपुरवठा वेळ द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा आगामी काळात शेतकरी आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे.

Spread the love