जळगाव – शहरातील शिवाजीनगर परिसरात गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहनाची तपासणी करणाऱ्या दोन तरुणांवर १० ते १५ जणांच्या टोळक्याने लोखंडी पाइप व लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. या हल्ल्यात राहुल सोनवणे व योगेश साळी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (GMC) अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर भागात गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती राहुल सोनवणे व योगेश साळी यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी नवीन कानळदा रोडवरील राजराजेश्री अपार्टमेंटसमोर एक छोटा हत्ती वाहन (एमएच ०४ एचडी ७५२९) थांबवून तपासणी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनाशी संबंधित असलेल्या समशेर नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर संबंधित व्यक्तीने फोन करून १० ते १५ जणांना घटनास्थळी बोलावले. काही क्षणांतच या टोळक्याने राहुल सोनवणे व योगेश साळी यांच्यावर हल्ला चढवला. योगेश साळी याच्यावर लोखंडी पाइपने वार करण्यात आला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या राहुल सोनवणे यांच्या डोक्यावरही पाइपने प्रहार करण्यात आल्याने त्यांचे डोके गंभीररीत्या फुटले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने राहुल यांची प्रकृती चिंताजनक बनली असून त्यांच्या डोक्यावर तब्बल १८ टाके घालावे लागल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर दोन्ही जखमींना तातडीने जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहुल सोनवणे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून योगेश साळी यांनाही गंभीर दुखापती झाल्या आहेत.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
“दिवसाढवळ्या झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.”












