भुसावळ, दि. २९ : भुसावळ शहरालगत झेडटीआरआय बोगद्यानजीक असलेल्या मंदिरातील मुख्य पुजाऱ्याची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या खळबळजनक घटनेमुळे भुसावळ शहरासह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला आहे.
मृत पुजाऱ्याचे नाव संतोष रघुवीर मंचल (वय ५५, रा. झेडटीआरआय परिसर, भुसावळ) असे आहे. ते आरपीडी मार्गालगत लष्करी डेपोपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील तीन मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून नियमितपणे पूजा-अर्चा करत होते. धार्मिक वृत्ती आणि शांत स्वभावामुळे परिसरात त्यांचा मोठा आदर होता.
सोमवारी सकाळी कुटुंबीय नेहमीप्रमाणे मंदिरात गेले असता संतोष मंचल हे मंदिर परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरडा केला आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.
या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चोरीच्या उद्देशाने हा प्रकार घडला की वैयक्तिक वैमनस्यातून किंवा अन्य कोणत्या कारणातून हत्या करण्यात आली, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची तपासणी करून महत्त्वाचे नमुने व पुरावे गोळा केले आहेत.
संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि स्थानिकांकडून चौकशी सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या निर्घृण हत्येमुळे भुसावळ शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा लवकर छडा लावून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.












