जळगाव, प्रतिनिधी : जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (गँगरेप) करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणात १५ पैकी १४ आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २ जून रोजी देऊळगाव-कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील निर्जन जंगल परिसरात घडली. पीडित महिला तिच्या परिचयातील मित्रासोबत जात असताना दोन आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर मित्रासमोरच महिलेवर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या इतर सहआरोपींनी संपूर्ण प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण केले.
व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रकरण उघड
घटना घडल्यानंतर काही दिवस हे प्रकरण दाबून ठेवण्यात आले होते. मात्र, या प्रकरणातील एका संशयित आरोपीने अत्याचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली.
पोलिसांची धडक कारवाई
फत्तेपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७०(१), ७७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ आणि ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली
या प्रकरणात एकूण १५ आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी १४ जणांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे.
याबाबत विभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून उर्वरित आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल.












