जळगाव, प्रतिनिधी : नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आर. आर. सोनवणे हे गेल्या पाच वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असून त्यांच्या तात्काळ बदलीची मागणी करत जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष प्रदीप साळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज सादर केला आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार नगरपरिषदेतील मुख्याधिकाऱ्यांचा कार्यकाळ साधारणतः तीन वर्षांचा असतो. मात्र, आर. आर. सोनवणे हे मार्च २०२१ पासून नशिराबाद नगरपरिषदेत कार्यरत असून अद्याप त्यांची बदली झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदाराने नगरपरिषदेतील विविध कामकाजांबाबत गंभीर आरोप केले आहेत. घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांमध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारांना वारंवार कामे देण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य, ईपीएफ, पगार पावत्या आणि इतर सुविधा नियमितपणे दिल्या जात नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय दिव्यांगांसाठी असलेल्या पाच टक्के निधीच्या वापराबाबतही अनियमितता झाल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे. नशिराबाद शहरातील पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदाराने आणखी आरोप करताना म्हटले आहे की, नागरिक किंवा कर्मचारी तक्रार घेऊन गेल्यास त्यांना दडपशाहीची वागणूक दिली जाते. त्यामुळे अनेकजण तक्रार करण्यास धजावत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या सर्व बाबींची सखोल चौकशी करून मुख्याधिकारी आर. आर. सोनवणे यांची तात्काळ बदली करावी तसेच त्यांच्या कार्यकाळातील कामांची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत मुख्याधिकारी आर. आर. सोनवणे यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. प्रशासनाकडून चौकशी झाल्यानंतरच आरोपांचे सत्य समोर येणार आहे.












