भवानी नगरातील गरजू नागरिकांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवले; जनरल कामगार सेनेचे निवेदन

0
4

नशिराबाद (प्रतिनिधी) : नशिराबाद नगर परिषद हद्दीतील भवानी नगर परिसरात राहणाऱ्या अत्यंत गरीब व गरजू नागरिकांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याचा गंभीर आरोप करत जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप साळी यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद नशिराबाद यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, प्रधान सचिव (गृहनिर्माण विभाग) तसेच मुख्यमंत्री कार्यालयालाही पाठविण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भवानी नगर परिसरात अनेक कुटुंबे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. अनेक घरे झोपडपट्टीसदृश अवस्थेत असून काही कुटुंबे कच्च्या व जीर्ण घरांमध्ये राहत आहेत. पावसाळ्यात घरांमध्ये पाणी गळते, तर सुरक्षित निवाऱ्याचा अभाव असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

विशेष बाब म्हणजे या परिसरातील अनेक नागरिकांकडे ७/१२ उतारा किंवा सिटी सर्व्हे उतारा उपलब्ध नसून नमुना ८-अ उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाच्या घरकुल योजनेसाठी पात्र असूनही त्यांना लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मागील पाच वर्षांपासून या परिसरातील एकाही पात्र गरीब कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

प्रमुख मागण्या

जनरल कामगार सेनेने प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत :

भवानी नगर परिसरात तातडीने विशेष सर्वेक्षण करून पात्र व गरजू कुटुंबांची यादी तयार करावी.

मागील पाच वर्षांत घरकुल योजनेचा लाभ का मिळाला नाही, याची सखोल चौकशी करावी.

नमुना ८-अ धारक नागरिकांनाही घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाकडून आवश्यक मार्गदर्शक सूचना मागवून कार्यवाही करावी.

पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा.

संपूर्ण प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांचा अहवाल सार्वजनिक करावा.

निवेदनात प्रशासनाला १५ दिवसांच्या आत ठोस कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा भवानी नगरातील नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही जनरल कामगार सेनेने दिला आहे.

या निवेदनामुळे भवानी नगरातील घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या गरीब व गरजू नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Spread the love