३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेला भारतभरातून २२ लाख विद्यार्थी बसले होते . परीक्षा झाल्यानंतर ९ व्या दिवशी ही परीक्षाच रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आणि देशभरात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला . त्यात १५ मे २०२६ रोजी एका न्यायालयीन खटल्यात सरन्यायाधीश के. सूर्यकांत यांनी भारतातील विद्यार्थ्यांना झुरळ , परजीवी असे संबोधले व तरुणांमध्ये अधिकच संताप निर्माण झाला .

नीट पेपरफुटी प्रकरणाने काही युवकांनी आत्महत्या केल्या . यासर्व प्रकरणास केंद्रीय शिक्षणमंत्री जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून नव्यानेच स्थापन झालेल्या ‘ कॉक्रोच जनता पार्टीने ‘ दिल्लीच्या जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केले . या आंदोलनात भारतातील प्रसिद्ध पर्यावरणवादी नेते , शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक यांनी सहभाग घेतला व दिनांक २८ जून २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले . यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र झाले . भारतीय राजकारणाच्या पटलावर धर्मेंद्र प्रधान केंद्रस्थानी आले. भारतातील जवळ जवळ सर्व विरोधी पक्षनेते , विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज जंतर मंतर येथे सोनम वांगचूक यांना भेटून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठींबा देऊ लागले व धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागू लागले . विविध शहरांमध्ये विविध संघटना रस्त्यावर येऊन ते सुद्धा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागू लागले . आज या आंदोलनाला ३६ दिवस झाले व अखेर प्रधान यांना राजीनामा देणे भाग पडले .
पेपरफुटी प्रकरणाने देशविदेशात चर्चिले जाणारे धर्मेंद्र प्रधान हे जेंव्हा विद्यार्थी दशेत होते तेंव्हा मात्र अश्याच एका पेपरफुटी प्रकरणी झालेल्या आंदोलनाचे प्रमुख होते .धर्मेंद्र प्रधान हे ओडिसा येथील ‘ उत्कल विद्यापिठात ‘ शिक्षण घेत होते . १९८३ पासून ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करू लागले होते . तसे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होतेच. त्यांचे वडील डॉ. देवेंद्र प्रधान हे सुद्धा आर. एस. एस. चे एकनिष्ठ नेते , केंद्रात मंत्री होते . धर्मेंद्र प्रधान हे विध्यार्थी असतानाच विविध आंदोलनात भाग घेत असत . असे असले तरी उत्कल विद्यापिठात ते फारसे परिचित नव्हते . या विद्यापिठात विद्यार्थी संघाच्या एका निवडणुकीत ए.बी. व्ही.पी. या आर.एस.एस.प्रणित विद्यार्थी संघटनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती . तेंव्हा जनता दलाचे अरुण साहू व काँग्रेस पक्षाच्या सिंधुज्योती त्रिपाठी हे त्यांच्या विरुध्द उमेदवार होते तेंव्हा अरुण साहू हे प्रचंड फरकाने निवडून आले होते . धर्मेंद्र प्रधान तिसऱ्या क्रमांकावर होते .
ओडिसा मध्ये १९८८ ते १९९७ या कालावधीत अनेकदा पेपर फुटलेले आहेत . १९९७ ला झालेल्या पेपरफुटी विरुध्द अभाविप तर्फे भुवनेश्वर येथील राजभवन समोर मोठे आंदोलन करण्यात आले . या आंदोलनाच्या अग्रभागी धर्मेंद्र प्रधान होते . सुमारे १५०० विद्यार्थी यात सहभागी झालेले होते . या आंदोलनाला मोडीत काढण्या करिता पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला . यात अनेक विद्यार्थी जखमी झाले . त्या जखमींमध्ये धर्मेंद्र प्रधान सुद्धा होते . हे आंदोलन अयशस्वी झाले . यावेळेस जे. बी. पटनायक हे ओडिशाचे मुख्यमंत्री होते . त्यांनी चर्चेतून तोडगा काढला .
विद्यापीठातील निवडणुकीत झालेला पराभव , आंदोलनात येत गेलेला पराभव असे जरी होत गेले तरी प्रधान यांनी संघटन सुरूच ठेवले होते .प्रचंड बुद्धिमत्ता व संघटन कौशल्य यामुळे त्यांनी विद्यार्थी चळवळीतून राजकारणात उडी घेतली . भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष , भा.ज.पा.चे राष्ट्रीय सरचिटणीस , उत्तर प्रदेश , बिहार , कर्नाटक राज्यांचे प्रभारी अश्या विविध जबाबदाऱ्या त्यांना पुढं मिळत गेल्या . सन २००० मध्ये ते पल्लहरा येथून ओडिसा विधानसभेत आमदार म्हणून प्रथम निवडून आले. त्यांच्या निवडीची धास्ती बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांनी घेतली होती . धर्मेंद्र प्रधान यांचा विजय माझ्याकरिता डोकेदुखी आहे असे त्यांनी सांगितले होते . पटनायक यांच्या या विधानावरून प्रधान यांचे एकूण कार्य लक्षात येते .
२००४ मध्ये ते देवगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले . २०१४ ला केंद्रात ते पेट्रोलियम मंत्री झाले . २०२१ ला शिक्षणमंत्री , कौशल्य विकास , उद्योजकता मंत्री झाले . त्यांनी शिक्षणक्षेत्रात अनेक बदल केले . परंपरागत व्यवसाय विकासावर भर दिला . त्यांच्या काळात नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा कारभार पूर्णतः विस्कटला, अनेक प्रश्न नव्याने निर्माण होत गेले . न्यू एज्युकेशन पॉलीसीला ‘ नो एज्युकेशन पॉलिसी ‘ म्हणून संबोधले जाऊ लागले . स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक गैरव्यवहार होत राहिले . २०१७ पासून शिक्षणक्षेत्रात निर्माण होत गेलेले प्रश्न वाढतच राहिले . विद्यार्थीसंख्या घटत गेली . अनेक शाळा बंद पडत गेल्या , पर्यायाने या सर्व प्रकरणांना , गैरव्यवहारांना , विद्यार्थ्यांच्या एकूण नुकसानीस , आत्महत्येस केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरले गेले . याविरुद्ध देशभरातील विद्यार्थी एकजूट झाले , त्यांनी लाठ्या खाल्या , पोलिसांच्या दडपशाहीला सामोरे गेले . आपल्या न्याय्य मागण्यांकरिता ठाम राहिले व अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडले .
लेखक
जयसिंग वाघ
अजिंठा हाउसिंग सोसायटी , अजिंठा चौक, जळगाव
संपर्क ….. ९८८१९२८८८१












