प्रतिनिधी जितेंद्र काटे |
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील केबल वायर चोरीच्या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रकरणासंदर्भात गावातील विविध ग्रुपवर मेसेज व्हायरल होत असून, ग्रामपंचायत शिपाई पंकज नथू पाटील यांनी आपल्या नावाचा फिर्यादीमध्ये समावेश करण्यात आल्याबाबत गंभीर आक्षेप घेत खुलासा केला आहे.
दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी श्री. ईश्वर अंकुश पाटील यांच्या नावाने दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये सुनसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे पती भोजराज आत्माराम कोळी, उपसरपंच एकनाथ फुलसिंग सपकाळे, सदस्य सुनील परशुराम कंकरे, सदस्य चंद्रकांत नामदेव पाटील, सदस्यापती राहुल जयराज नारखेडे आणि सदस्याचा मुलगा सागर रामचंद्र शिरसाळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नावे नमूद करण्यात आल्याचा दावा पंकज पाटील यांनी केला आहे.
पंकज पाटील यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील तांब्याच्या वायरची सुमारे तीन किलो केबल चोरीस गेल्याचे नमूद करण्यात आले असून, तिची किंमत अंदाजे ३ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मात्र, या प्रकरणात कायमस्वरूपी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांपैकी राहुल जनार्दन सपकाळे आणि सचिन कैलास शिरोळे यांच्याऐवजी आपले नाव फिर्यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप पंकज पाटील यांनी केला आहे. आपण कायमस्वरूपी कर्मचारी नसून गेल्या सात वर्षांपासून कारकून व शिपाई म्हणून प्रामाणिकपणे काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पाणीपुरवठ्याची विहीर संबंधित पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात असताना आपल्याला कोणतीही माहिती किंवा विचारणा न करता आपले नाव या प्रकरणात टाकण्यात आल्याचा दावा पंकज पाटील यांनी केला आहे. तसेच, काही ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांवर येणारी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपले नाव चुकीच्या पद्धतीने फिर्यादीमध्ये टाकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
यासंदर्भात सुनसगावचे पोलीस पाटील श्री. खुशाल लक्ष्मण पाटील यांच्यासह संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व इतर व्यक्तींनी आपले नाव फिर्यादीमध्ये कोणत्या आधारावर समाविष्ट केले, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पंकज पाटील यांनी केली आहे.
पोलीस स्टेशनला हजर नसतानाही नाव कसे?
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात ‘जळगाव संदेश’ने पंकज नथू पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, ज्या वेळी सदर फिर्याद दाखल करण्यात आली, त्या वेळी आपण पोलीस स्टेशनला हजर नव्हतो.असे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर, घटनास्थळी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच गावातील काही नागरिक उपस्थित होते, असेही पंकज पाटील यांनी सांगितले. असे असताना आपले नाव फिर्यादीमध्ये कशाच्या आधारे टाकण्यात आले, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
“माझी कोणतीही संमती किंवा माहिती न घेता माझे नाव या प्रकरणात टाकण्यात आले आहे. त्यामुळे माझी फसवणूक झाली असून, माझे नाव फिर्यादीमध्ये समाविष्ट करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी,” अशी भूमिका पंकज पाटील यांनी व्यक्त केली.
संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा
आपले नाव चुकीच्या पद्धतीने फिर्यादीमध्ये समाविष्ट करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच त्या वेळी पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे पंकज पाटील यांनी सांगितले.
या प्रकरणात आपले नाव नेमके कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या कारणास्तव फिर्यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले, याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, पंकज पाटील यांनी केलेल्या या आरोपांमुळे सुनसगावमधील केबल चोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणाच्या पुढील तपासात नेमके काय समोर येते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
टीप : वरील आरोप व दावे हे पंकज नथू पाटील यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवर आधारित आहेत. संबंधित इतर व्यक्तींची बाजू समोर आल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.










