तरसोद–पाळधी बायपासवर मोठा धोका टळला! रेल्वे उड्डाणपुलाजवळ महामार्गाचा भाग खचला; दोन्ही बाजूंची वाहतूक बंद

0
2

प्रतिनिधी | जळगाव | ३१ जुलै                            जळगाव शहरालगत नव्याने सुरू करण्यात आलेल्या तरसोद–पाळधी बायपास (राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३) वर शुक्रवारी (३१ जुलै) सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास एक गंभीर प्रकार घडला. तरसोदकडून असोदाकडे येताना रेल्वे उड्डाणपुलाजवळ महामार्गाचा काही भाग अचानक खचल्याचे निदर्शनास आले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने बायपासच्या दोन्ही बाजूंची वाहतूक बंद केली आणि सर्व वाहने जळगाव शहरातून वळविण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ वाहतूक थांबवून सुरक्षित पर्यायी मार्गाने वळवली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

मात्र या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अद्याप या बायपासला सुरू होऊन वर्षही पूर्ण झालेले नाही, तरी महामार्गाचा भाग खचणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. एवढ्या कमी कालावधीत रस्ता खचत असेल, तर त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे.

याहूनही गंभीर बाब म्हणजे, जर हीच घटना मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळी घडली असती आणि भरधाव वेगाने जाणारे ट्रक, बस किंवा इतर वाहने या खचलेल्या भागात कोसळून मोठा अपघात झाला असता, तर त्या संभाव्य जीवितहानीची जबाबदारी कोण स्वीकारली असती? या प्रश्नाचे उत्तर संबंधित यंत्रणांनी आणि ठेकेदाराने जनतेला द्यावे.

स्थानिक नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत असून, सार्वजनिक बांधकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम, देखरेखीचा अभाव आणि कथित “दक्षिणा” अथवा टक्केवारीच्या व्यवहारांमुळे गुणवत्तेशी तडजोड केली जाते, अशी चर्चा सुरू आहे. अशा प्रकारच्या आरोपांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. जर कुठल्याही स्तरावर गैरव्यवहार झाला असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

जनतेच्या करातून उभारण्यात आलेले कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प काही महिन्यांतच धोकादायक ठरत असतील, तर हा केवळ अभियांत्रिकीचा प्रश्न नसून जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.

या घटनेची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून रस्ता खचण्याचे नेमके कारण, कामाची गुणवत्ता, संबंधित ठेकेदार, देखरेख करणारे अधिकारी आणि दोषींवर होणारी कारवाई याबाबत प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Spread the love