नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेच्या बैठकीत शुक्रवारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बेताल वक्तव्यावरून चांगलाच गदारोळ झाला. ज्येष्ठ सदस्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध प्रस्ताव विद्यापीठाने पारित करावा अशी मागणी केली. यावर, अभाविपच्या वतीने सदस्य विष्णू चांगदे यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. मात्र, यावरून बैठकीत चांगलीच चर्चा रंगली.
विधिसभा सदस्य दिनेश शेराम यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठाने विविध उपक्रम राबवावे, असा प्रस्ताव मांडला. यावर भारताला ‘१९४७ साली मिळाले ते स्वातंत्र्य नसून भीक आहे, खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले’, असे बेताल वक्तव्य करून कंगणाने हजारो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. हा देशद्रोहच आहे. त्यामुळे तिच्या विरोधात विद्यापीठाने ठराव घ्यावा, अशी मागणी तायवाडे यांनी केली. याला अॅड. वाजपेयी यांनी समर्थन दिले. यावर चांगदे यांनी कंगनाचा विषय हा शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित नसल्याने यावर विद्यापीठ निर्णय कसा घेईल, असा सवाल उपस्थित केला. शिवाय अनेक लोक महात्मा गांधी, वीर सावरकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य करतात. मग अशा सर्वच विधानांवर ठराव घेण्याची प्रथा पडेल असे सांगत विरोध केला. मात्र, यावरून विधिसभेचे वातावरण चांगलेच तापले होते.
कंगनाविरुद्ध बर्डी पोलीस ठाण्यात देशद्रोहाची तक्रार
याचप्रकरणी आम आदमी पार्टीने कंगना राणावत हिच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी शुक्रवारी बर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही तक्रार करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने राज्य सहसचिव अशोक मिश्रा,नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, लीगल सेल प्रमुख राजेश भोयर हे प्रामुख्याने उपस्थित होते. कंगणाने जाणीवपूर्वक आणि राजकीय हेतूने हे विधान केले. यामुळे स्वातंत्र्यलढय़ात बलिदान देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांचा अवमान झाला आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध देशद्रोहाच्या आरोपाखाली कारवाई करा, असे आपने तक्रारीत नमूद के ले आहे.












