आता फुटबॉल-हॉकीप्रमाणे बदली खेळाडूचा क्रिकेटमध्येही वापर केला जाणार आहे. स्थानिक पातळीवरील क्रिकेट स्पर्धेत बदली खेळाडूचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता बीसीसीआयने आयपीएलमध्येही टॅक्टिकल सबस्टिटय़ूट (रणनीतिक पर्याय) या नव्या नियमाची घोषणा केली आहे. आगामी आयपीएलमध्ये या नियमांतर्गत प्रत्येक संघ प्रभाव खेळाडू म्हणून एका खेळाडूची बदली करू शकेल. याकरिता प्रत्येक संघाला अकरा खेळाडूंच्या अंतिम संघासह चार बदली खेळाडूंचीही नावे जाहीर करावी लागतील आणि चारपैकी एकाच खेळाडूला 14 षटकांपूर्वी संघातील कोणत्याही खेळाडूच्या जागी खेळविता येईल. बीसीसीआयने प्रभाव खेळाडूबद्दल सविस्तर माहिती अद्याप जाहीर केलेली नाही.
असा असेल नियम
समजा एखाद्या गोलंदाजाने आपल्या कोटय़ातील दोन षटके टाकली आहेत आणि तो गोलंदाज फारशी चांगली गोलंदाजी करीत नसेल तर त्याच्या जागी प्रभाव खेळाडूला घेता येईल. एवढेच नव्हे तर तो गोलंदाज बाहेर केलेल्या गोलंदाजाची उरलेली षटकेच गोलंदाजी करेल असे नाही. तो आपल्या गोलंदाजीचा चार षटकांचा कोटा पूर्ण करू शकले. एखाद्या फलंदाजाच्या बाबतीतही हाच नियम लागू असेल, मात्र नियमाबाबत पूर्ण माहिती जाहीर झाल्यावरच हा नियम किती प्रभावी ठरेल, हे निश्चितपणे सांगता येईल.











