भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली होती. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. या प्रकरणी शाईफेक करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते, तसेच याचे चित्रिकरण करणाऱ्या एका पत्रकाराची चौकशी करण्यात आली होती. आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण शाईफेक करणाऱ्याला आधी राजरत्न आंबेडकर यांनी 1 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते आणि आता डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची घोषणा केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर इथे आयोजित धम्म संमेलनात बोलताना राजरत्न आंबेडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या मनोज गडबडे याला एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. आता गडबडे आणि पत्रकार गोविंद वाकडे यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची घोषणा डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांनी केली आहे. सांगलीत 23 डिसेंबर रोजी दोघांचा सत्कार करण्यात येईल असे कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.
नक्की काय घडलं?
कर्मवीर भाऊराव पाटील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले या थोर पुरुषांचा घोर अवमान करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. चिंचवड गावात एका कार्यक्रमासाठी आलेले असताना हा प्रकार घडला. कडेकोट पोलीस बंदोबस्त, सुरक्षारक्षकांचा गराडा असतानाही अचानक मंत्र्यांवर शाईफेकीची घटना घडल्याने गोंधळ उडाला.
काय म्हणाले होते पाटील?
पैठण येथील संतपीठाच्या कार्यक्रमात शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केले. ‘कर्मवीर भाऊराव पाटील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांनी भीक मागून शाळा उभारल्या,’ असे संतापजनक वक्तव्य पाटील यांनी केले. या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. विविध राजकीय पक्ष, संस्था-संघटनांनी सनदशीर मार्गाने निषेध नोंदविला. कुठे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले, तर कुठे घोषणाबाजी करण्यात आली.











