Pathaan मधील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून गदारोळ, ‘या’ राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिली बंदी घालण्याची धमकी

0
46

अभिनेता शाहरूख खानआणि अभिनेत्री दीपिका पदुकोणच प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी चित्रपटातील पहिले गाणे ‘बेशरम रंग’ रिलीज करण्यात आले. तेव्हापासून या गाण्यातील बोल आणि दीपिकाचे कपडे यावरून सोशल मीडियावर मोठा गदारोळ उडाला आहे.

‘बेशरम रंग’ या गाण्यामध्ये दीपिका पदुकोण हिने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. त्यामुळे वादाला सुरुवात झाली आणि सोशल मीडियावर चित्रपटाला बायकॉट करण्याची मागणी होत आहे. या वादात आता राजकीय नेत्यांनी उडी घेतली आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तमदास मिश्रा  यांनी तर या चित्रपटावर राज्यात बंदी घालण्यात येईल, अशी धमकीही दिली आहे.

‘पठाण’ या चित्रपटात अनेक चुका असून हा चित्रपट विखारी मानसिकतेवर आधारित आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्याचे बोल आणि दीपिका पदुकोण हिने घातलेली भगव्या रंगाची बिकीनी बदलण्याची गरज आहे, अन्यथा मध्य प्रदेशमध्ये आम्ही या चित्रपटाचा एकही शो लागू देणार नाही, अशी धमकी नरोत्तमदास मिश्रा यांनी दिली आहे.

दुसरीकडे स्वामी चक्रपाणी महाराज यांनीही सोशल मीडियाद्वारे या चित्रपटावर टीकेची झोड उठवली आहे. शाहरूख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने भगवा आणि हिंदू संस्कृतीचा अपमान केला आहे. सेन्सर बोर्ड झोपा काढतंय का? या चित्रपटावर बंदी घाला. अन्यथा हिंदू महासभा याचा विरोध करेल, असे ट्विट अखिर भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी केले आहे.

Spread the love