औरंगाबाद मध्ये सैराटची पुनरावृत्ती ! बहिणीशी प्रेमविवाह करणाऱ्याची निर्घृण हत्या

0
46

औरंगाबाद जिल्ह्यात सैराटची  पुनरावृत्ती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीला पळवून नेणाऱ्या व्यक्तीवर भर रस्त्यात कुऱ्हाडीचे वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. बापू खिल्लारे (वय 30) असे मृत युवकाचे नाव आहे. तर हत्या करणारा आरोपी फरार झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून भावाने आपल्या बहिणीच्या पतीची हत्या केली आहे. औरंगाबाद पुणे महामार्गावरील  दहेगाव बंगला जवळ इसारवाडी फाटा येथे भर रस्त्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर बहिणीच्या पतीचा जीव गेल्याची आरोपीने खात्री करून रस्त्यावरच जल्लोष केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाला.

दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच, वाळूज पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेत आरोपी गेलेल्या दिशेने पोलीस पथके रवाना केली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांनी भेट दिली. बापू खिल्लारे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय घाटी रुग्णालयात  पाठवण्यात आला आहे.

Spread the love