फुले मार्केटमध्ये अतिक्रमणधारक, दुकानदारांत वाद; व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद

0
46

जळगाव : शहरातील फुले मार्केटमध्ये दुकान लावण्यावरून गुरुवारी (ता. २) अतिक्रमणधारक व दुकानदार यांच्यात वाद झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी संपूर्ण मार्केटच बंद ठेवले.

मार्केटमधील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटमध्ये वाढत्या अतिक्रमणाबाबत नेहमीच तक्रारी आहेत. या ठिकाणी अतिक्रमणएवढे झाले आहे, की खरेदीस येणाऱ्या नागरिकांना चालण्यासाठी जागाही राहत नाही. याठिकाणी अतिक्रमणधारकांचे कायमच वाद होत असतात.

हे अतिक्रमण हटवावे, यासाठी अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, महापालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आपल्याकडे कर्मचारी नसल्याची व पोलिस संरक्षण मिळत नसल्याचीही तक्रार अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी करीत असतात. त्यामुळे या ठिकाणच्या अतिक्रमणावर कारवाई होत नाही.

दुकान लावण्यावरून वाद

फुले मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी दुकाने उघडल्यानंतर अतिक्रमणधारकांनीही आपली दुकाने लावण्यास प्रारंभ केला. त्या वेळी एका कापड दुकानासमोर

अतिक्रमणधारक दुकाने लावत असताना, त्यांना दुकानदाराने मज्जाव केला. मात्र अतिक्रमणधाारकाने उलट दुकानदारालाच अरेरावी केली. यावरून दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. त्यामुळे व्यापारीही संतप्त झाले.

व्यापाऱ्यांनी केली दुकाने बंद

फुले मार्केटमधील अतिक्रमणाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध केला. सकाळपासूनच फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटची दुकाने बंद होती. संपूर्ण मार्केटमध्ये शुकशुकाट होता. व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व शहर पोलिस ठाण्याला निवेदन दिले.

महापालिकेची कारवाई, पण बंदोबस्त मिळेना

फुले मार्केटमध्ये वाद झाल्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. व्यापारी पोलिस ठाणे व महापालिकेतही थडकले. त्यांनी अतिक्रमण काढण्याची मागणी केली. महापालिकेचे अधिकारीही जागे झाले. त्यांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.

Spread the love