भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी आणि भगवान विश्वकर्मा यांच्यावर आधारीत एक धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेमध्ये केली. चिपळूण येथे नुकताच रत्नागिरी जिल्हा पांचाळ, सुतार समाज संघ रत्नागिरीचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी चिपळूण तालुका विश्वकर्मा पांचाळ, सुतार समाज संघाच्या वतीने विश्वकर्मा जयंतीची सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याकरीता आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली होती.
भगवान विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत अधिनियम 377 अन्वये भगवान विश्वकर्मा हे सृष्टीचे निर्माते मानले जातात. भगवान विश्वकर्मा कलेची देवता आहेत. हिंदुस्थानात त्यांचे कोट्यवधी अनुयायी आहेत. ते दरवर्षी भगवान विश्वकर्मा जयंती साजरी करतात. त्यामुळे भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त देशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. तसेच शालेय अभ्यासक्रमात भगवान विश्वकर्मा यांचा एक धडा समाविष्ट करावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत केली.











