चोपडा – बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारमधील मंत्री अखिल गिरी यांनी भारताच्या महामहिम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्याबद्दल अशलाघ्य विधान केलेले असून त्यांच्या ह्या विधानाचा आदिवासी कोळी समाज संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येऊन त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करून त्यांचा आमदारकीचाही राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी चोपडा तालुका कोळी समाज मंडळाचे संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी हा पत्रकान्वये केली आहे.
“आम्ही कुणालाही त्याच्या दिसण्यावरून ओळखत नाही, आम्ही भारताच्या राष्ट्रपतीपदाचा आदर करतो, पण आमच्या राष्ट्रपती कशा दिसतात ?” असे विधान मंत्री अखिल गिरी यांनी नंदिग्राम येथील एका कार्यक्रमात केलेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील असून त्यांच्या दिसण्यावरून वक्तव्य करणारे मंत्री व त्यांच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष हा आदिवासी विरोधीच आहे असेच म्हणावे लागेल. मंत्रिपदावर असणारी व्यक्ती देशाच्या महिला राष्ट्रपतींबद्दल असे विधान करत असेल तर अशा मंत्र्यावर एक महिला म्हणून तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे, अशीही सुचक प्रतिक्रिया सामा. कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी दिली आहे.










