अमृता फडणवीसांना ‘Y+’ दर्जाची सुरक्षा, रस्ता मोकळा करून देणारे वाहनही मिळणार

0
47

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहखात्याचा भारही सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आता ‘X’ दर्जाच्या सुक्षेऐवजी ‘Y+’ दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाने त्यांच्या सुरक्षा दर्जात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अमृता फडणवीस यांचा ताफा विनाअडथळा धावावा यासाठी रस्ता मोकळा करणारे वाहनही त्यांच्या ताफ्यात सामील करण्यात आले आहे. ‘Y+’ दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत एक एस्कॉर्ट वाहन आणि चोवीस तास 5 पोलीस कर्मचारी तैनात केलेले असतात. याशिवाय रस्ता मोकळा करून देण्यासाठी एक विशेष वाहनही असते जे एका पायलट व्हॅनसारखे ताफ्याच्या पुढे असते. याबाबतचे वृत्त इंडिअन एक्सप्रेस या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे.

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ताफ्यात सामील करण्यात आलेल्या रस्ता मोकळा करून देणाऱ्या वाहनाचा अद्याप वापर करण्यात आलेला नाहीये. असं असलं तरी त्यांच्या सुरक्षा दर्जातील बदलाबाबत वाहतूक पोलिसांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. इंडिअन एक्सप्रेसलाला दिलेल्या प्रतिक्रियेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की सुरक्षा व्यवस्था वाढवण्याबाबत अमृता यांनी कोणताही अर्ज केलेला नव्हता. त्यांना असलेला संभाव्य धोका लक्षात घेता उच्चस्तरीय समितीने सुरक्षा दर्जात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रस्ता मोकळा करून देणाऱ्या वाहनासाठी देखील अमृता फडणवीस यांनी अर्ज केला नसल्याचे देवेंद्र यांनी सांगितले.

रस्ता मोकळा करून देणाऱ्या वाहनामध्ये शस्त्रधारी पोलीस नसतात. हे वाहन सुरक्षा पुरवण्यासाठी नसते. या वाहनात दोन पोलीस कर्मचारी असतात, ज्यातील एक जण हा गाडीचा चालक असतो. हे वाहन अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या गाडीपासून थोड्या अंतरावर असते आणि ते सातत्याने वाहतूक नियंत्रण कक्षाच्या संपर्कात असते. या वाहनातील पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असतात जे अतिमहत्त्वाची व्यक्ती कुठपर्यंत पोहोचली आहे हे जाणून घेतल्यानंतर त्या मार्गावरील वाहतूक नियंत्रित करून या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी रस्ता मोकळा करून देतात असे एका पोलीस अधिकाऱ्याने इंडिअन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

Spread the love