बेलव्हाळ व सुनसगाव येथे वाळू व्यावसायिकांवर महसूल व पोलीसांची संयुक्त कारवाई ?

0
2

प्रतिनिधी -जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या बेलव्हाळ येथे वेगवेगळ्या तीन ठिकाणी साठवून ठेवलेली १६५ ब्रास वाळू जप्त करुन तिघांविरुद्ध भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सुनसगाव रस्त्यावर दोन डंपरसह ८ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.

या बाबत भुसावळ तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की , दि.२० जुलै रोजी सायंकाळी ५:२० वाजेच्या सुमारास आरोपी रमेश श्रावण सोनवणे , गौरव रमेश सोनवणे व अविनाश चंद्रकांत पवार सर्व रा. बेलव्हाय ता भुसावळ यांनी बेलव्हाय गावानजीक वाघुर नदीच्या पात्रात विना परवाना वाळूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाळूचे उत्खनन करून तीन ठिकाणी वाळूचे ढीग तयार करून ठेवले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात वाघुर नदीच्या पात्रात ५० ब्रास वाळू , बेलव्हाय गावाचे रस्त्यावर नदी पात्रा शेजारी ६५ ब्रास आणि बेलव्हाय गावाचे मागे निमगाव रस्त्यावर ५० ब्रास अशा प्रकारे १६५ ब्रास वाळू तीन ढीग तयार केले असल्याची फिर्याद बेलव्हाळ ग्राम महसूल अधिकारी सुनिता अमरसिंग वळवी यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दिली असून घटनास्थळी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली . या बाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुरनं १३४/२०२६ महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८ व भारतीय न्याय संहिता कलम ३०३ ( २ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई महसूल विभाग व तालुका पोलीसांनी एकत्र येऊन केली असल्याचे समजते. ही कारवाई भुसावळ तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी प्रविण पाटील , तलाठी सुनिता वळवी , गोपाळ भगत , रुपेश लिधुरकर ,प्रमोद ठोसर ,साधना खुळे , सुनील कचगुड्डे , कविता तायडे ,निशा गायकवाड ,कोतवाल संजय गोसावी , इम्रान शेख व भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व कुऱ्हा पानाचे पोलीस कर्मचारी यांनी केली. या बाबत चा तपास पोहेकाॅ विकास बाविस्कर करीत असून आरोपींना लवकरात लवकर वाहनासह अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दुसऱ्या घटनेत दि.२२ जुलै रोजी वाघुर नदीच्या पात्रातून सर्रास पुणे अवैधरित्या वाळूची चोरी होत असताना भुसावळ तालुका पोलीसांनी कारवाई करीत २० लाख रुपये किंमतीचे दोन डंपर व त्यातील ३२ हजारांची वाळू जप्त केली. दि.२२ जुलै रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुनसगाव वाघुरनदी पुलाजवळ डंपर क्रमांक एम एच ( १९ झेड ०९३२ ) वरील चालक अनिल सुपडू सोनवणे रा.बांभोरी ता.धरणगाव हा १२ हजार रुपये किंमतीची ३ ब्रास वाळू चोरताना आढळल्याने वाहन जप्त करण्यात आले.या प्रकरणी हवालदार महेश एकनाथ चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला तसेच याच दिवशी डंपर क्रमांक यु पी ५३ जी टी ११७१ वरील चालक आकाश सुरेश पारधी रा.धानोरा ता.चोपडा हा २० हजार रुपये किंमतीची वाळू चोरताना आढळल्याने त्याच्या विरोधात हवालदार महेश एकनाथ चौधरी यांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घटनांचा तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेडेड उपनिरीक्षक संजय कंखरे व व हवालदार धिरज मंडलिक हे करीत आहेत.

या परिसरात झालेल्या या कारवाईमुळे वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांनी महसूल व पोलीस खात्याला घाबरून वाहने उभी करून ठेवल्याची चर्चा सुरू आहे.

Spread the love