प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – पोलीस दलात सेवा बजावण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुण-तरुणींसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रेल्वे ग्राउंड, भुसावळ येथे भव्य ‘पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर’ उत्साहात पार पडले. दिनांक 29/10/2026 रोजी सायंकाळी 4.00 वा. आयोजित या शिबिराला परिसरातील शेकडो युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर शिबिराचे आयोजन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री. संजय सावकारे उपस्थित होते. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक, जळगाव श्री. संदीप गावित यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित पोलीस अधिकारी व प्रशिक्षकांनी भावी उमेदवारांना भरती प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
*मैदानी चाचणी-* धावणे व इतर शारिरिक चाचण्यांमध्ये अधिकाधिक गुण कसे मिळवावेत, स्टॅमिना कसा वाढवावा आणि सरावाचे योग्य नियोजन कसे असावे, याविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
*लेखी परीक्षा तयारी-* बदलत्या अभ्यासक्रमाचे स्वरूप, वेळेचे व्यवस्थापन, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता व गणित या विषयांची अचूक तयारी कशी करावी, याच्या उपयुक्त टिप्स देण्यात आल्या.
*कागदपत्रांची पडताळणी-* भरतीदरम्यान कोणत्याही तांत्रिक त्रुटीमुळे अपात्रता येऊ नये म्हणून आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रांची योग्य पूर्तता कशी करावी, याविषयी माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमात भुसावळ तालुकाचे प्रभारी परी.पोलीस उपअधिक्षक श्री. प्रशांत दरेकर, भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्री. महेश गायकवाड, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, जळगांव पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत सुग्रवार, शहर वाहतुक शाखेचे API राहुल भंडारे, API शत्रुग्न पाटील, PSI विजय कोळी हे देखील उपस्थित होते. तसेच ग्रामीण व शहरी भागातील तरुणांनी शिस्तीचे पालन करून कठोर परिश्रम घ्यावेत, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी शिबिरातून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त करत पोलीस दलाच्या या उपक्रमाचे आभार मानले.










