सत्तारांचा फुसका बार, सिल्लोडमध्ये मुख्यमंत्रीपुत्राच्या सभेचा फ्लॉप शो

0
44

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सिल्लोड येथील सभेचा फियास्को झाला. मंत्री अब्दुल सत्तार यांनी या सभेचे आयोजन केले होते. या सभेला लाखोंची गर्दी होईल, असा दावा सत्तार यांनी केला होता मात्र, प्रत्यक्षात मोठय़ा प्रमाणात खुर्च्या रिकाम्या राहिल्याने सत्तार यांच्या दाव्यातील हवा निघून गेली.

सभा सुरू असतानाच लोक निघून जात असल्याचे पाहून सत्तार संतापले. सभा संपेपर्यंत कुणीही जाऊ नये, असे ओरडून सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली. मात्र, त्यानंतरही जाणारे लोक थांबले नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने अब्दुल सत्तार वादाच्या भोवऱयात सापडले असताना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना झापल्याच्या बातम्या येत असताना सत्तार यांचा त्यांच्या सिल्लोड मतदारसंघातच फज्जा उडाला आहे. सत्तार यांनी मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्रीपुत्राची सभा आज आयोजित केली. या सभेला लाखोंची गर्दी होईल, असा दावा सत्तार करत होते, मात्र हा दावा फुसका ठरला. सभेसाठी श्रीकांत शिंदे दाखल झाले मात्र मैदान भरले नव्हते. अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकामी होत्या. मैदानात खुर्च्या रिकाम्या पाहून सत्तार यांची भंबेरी उडाली.

सभेला शेवटपर्यंत राहण्यासाठी दमबाजी!

शिंदे यांचे भाषण सुरू होण्याआधीच सभेतून लोक उठून चालले होते. त्यामुळे सत्तार यांनी ओरडतच, शिंदे यांचे भाषण झाल्याशिवाय कुणीही निघून जाऊ नये, असे सांगितले. मात्र, लोकांनीही काही ऐकले नाही. लोक निघून जात होते. त्यामुळे अनेक खुर्च्या रिकाम्या झाल्या. ही दृष्ये कॅमेर्‍यात कैद होत असल्याचे पाहून धावपळ उडाली. रिकामी खुर्च्या उचलून बाजूला ठेवल्या गेल्या. मात्र, सत्तार यांचं हसं व्हायचं ते झालंच.

Spread the love