QR Code स्कॅन करताय? तुमच्या सोबतही होऊ शकते अशी फसवणूक, ही बातमी नक्की वाचा

0
49

डिजिटल जग आणि सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकजण ऑनलाइन पेमेंटचा वापर करत असतो. बँकेत पैसे पाठवण्यासाठी सुद्धा लोक ऑनलाइन बँकिंगचा वापर करू लागले आहेत. याशिवाय ऑनलाइन पेमेंट करत असताना आता QR Code चा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आहे. मोठ्या दुकानांपासून अगदी छोट्या विक्रेत्यांकडे सुद्धा QR Code स्कॅन करुन पैसे भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

भाजी घेणं असो, नाहीतर पेट्रोल पंप असो, दूधाची पिशवी असो, नाहीतर शॉपिंग मॉल्स. आता ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करणं अगदी सोप्पं झालं. या प्रकारच्या ऑनलाइन पेमेंटमुळे वेळेची बचत होते यात शंकाच नाही. पण QR Code ची ही सुविधा ग्राहकांसाठी उपयोगी असली तरी त्याचे दुष्परिणाम ग्राहकांना भोगायला लागतायत. या झटपट पेमेंटमुळे फसवणूक होण्याची शक्यताही वाढल्या आहेत. त्यामुळे फसवणूक करणारेही याबाबत सक्रिय झाले असून या QR Code च्या नावाखाली लोकांच्या बँक खात्यातून पैसे काढतात आणि ग्राहकांना लाखो करोडो रुपयांना चुना लावला जातोय. म्हणूनच QR Code स्कॅन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून या प्रकारची फसवणूक टाळता येईल.

कसा केला जातो फ्रॉड?

QR Code द्वारे हॅकर्स ग्राहकांची फसवणूक करत आहेत. तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की, QR Code स्कॅन करून ग्राहकाच्या बँक खात्यातून किंवा वॉलेटमधून पैसे डेबिट केले जातात. तुम्ही जेव्हा QR Code पेमेंट करता, तेव्हा पैसे संबंधितांच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होतात. याचाच फायदा घोटाळेबाज घेतात. हे लोक QR Code बदलून टाकतात. त्यामुळे पेमेंट घोटाळेबाजांच्या खात्यात जमा होतं.

हे लक्षात ठेवा.

 

1. कोणत्याही दुकानात QR Code ने पेमेंट करताना दुकानदाराचं वेरिफाईड नाव जरूर विचारा.

2. एखादा QR Code स्कॅन करताना एखादी अनोळखी वेबसाईट ओपन होत असेल तर सावध व्हा. QR कोड स्कॅन केला असता जर तो तुम्हाला अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी लिंकवर घेऊन जात असेल तर तुम्हाला अशा लिंक्समधून बाहेर पडावे लागेल, कारण असे अ‍ॅप्स तुमच्या फोनमधील स्पायवेअर डाउनलोड करू शकतात आणि तुमची गोपनीय माहिती चोरू शकतात आणि तुम्हाला असुरक्षित बनवू शकतात.

3. कोणतंही पेमेंट रिसीव्ह करताना UPI पीन क्रमांकाची गरज नसते. त्यामुळं पेमेंट करण्याच्या नावाखाली कुणी QR Code स्कॅन करायला सांगून UPI पीन मागत असेल तर ते ट्रान्झॅक्शन मुळीच करू नका.

Spread the love