टाटा, खतम, गया, बाय-बाय; टीम इंडिया वर्ल्डकपमधून बाहेर, इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव

0
47

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचं टी-२० वर्ल्डकपमधलं आव्हान उपांत्य फेरीतचं संपुष्टात आलं आहे. अ‍ॅडलेडच्या मैदानावर झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर १० विकेट राखून दणदणीत मात करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. इंग्लंडच्या झंजावातासमोर टीम इंडियाचा आज निभाव लागला नाही.

उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी टीम इंडियाने संघात कोणतेही बदल केले नाहीत. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. अ‍ॅडलेडच्या मैदानावर टॉस जिंकलेला कर्णधार सामना जिंकत नाही हा गेल्या काही सामन्यांमधला इतिहास होता. परंतु इंग्लंडने ही सर्व आकडेवारी फोल ठरवली. सलामीवीर लोकेश राहुलला स्वस्तात बाद करत इंग्लंडने दिमाखात सुरुवात केली.

यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनीही मैदानात तग धरुन संघाची पडझड रोखली. परंतु पॉवरप्लेच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्यात टीम इंडिया अपयशी ठरली. ४७ धावांची भागीदारी झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा फटकेबाजीच्या नादात ख्रिस जॉर्डनच्या बॉलिंगवर बाद झाला. त्याने २७ धावा केल्या. यानंतर विराट आणि हार्दिकने भारताच्या डावाला स्थैर्य दिलं.

दोघांनीही फटकेबाजी करत चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडबून दिला. परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनीही भेदक मारा करत भारताला मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. अखेरीस अर्धशतक झळकावून विराट कोहली माघारी परतला. यानंतर हार्दिकने भारताला १६८ धावांपर्यंतचा टप्पा गाठून दिला. हार्दिकने ६३ तर विराटने ५० धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने ३ तर वोक्स आणि आदिल रशिदने १-१ विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी झंजावाती सुरुवात केली. पहिल्या षटकापासून जोरदार फटकेबाजी करत हेल्स आणि बटलर यांनी भारतीय गोलंदाजांवर दडपण आणलं. पॉवरप्लेच्या षटकांचा पुरेपूर फायदा उचलत दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडचं पारड जड केलं. त्यातच भारताच्या गोलंदाजांनी आजच्या सामन्यात अगदीच सामान्य मारा केला. त्यात गचाळ फिल्डींगने इंग्लंडला आणखीन मदतच मिळाली.

हेल्स आणि बटलर या दोघांनीही अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकत एकही विकेट न जाऊ देता इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हेल्सने नाबाद ८६ तर कर्णधार बटलरने नाबाद ८० धावा केल्या. विशेष म्हणजे इंग्लंडने हे आव्हान ४ ओव्हर बाकी ठेवून पूर्ण केलं. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आपण केलेलं विधानही यानिमीत्ताने खरं करुन दाखवलं.

Spread the love