आज हिंदुस्थान-पाकिस्तान मॅच, दिवसाच फटाके फुटणार, प्रथमच एमसीजीवर लाखांच्या गर्दीसमोर भिडणार क्रिकेटचे कट्टर प्रतिस्पर्धी

0
48

उठा उठा मॅच आली, दिवाळीच्या पूर्वसंध्येला दिवसाच फटाके फोडण्याची वेळ आली.’ खरोखरच रविवार दिवाळीमय करण्यासाठी हिंदुस्थानचा संघ टी-20 विश्वचषकात विजयी सलामीसाठी सज्ज झालाय. गेल्या वर्षी दुबईत पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवाचे उट्टे फेडून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) लाखो क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने तमाम हिंदुस्थानींना दिवाळीची भेट देण्यासाठीच टीम इंडिया उतरणार आहे.

मात्र टी-20 क्रिकेट हा बेभरवशाचा खेळ असल्यामुळे दिवाळीच्या पूर्वसंध्येला कुणाची दिवाळी असेल आणि कुणाचं दिवाळं निघेल हे रविवारी संध्याकाळी कळेल, पण सामन्यात पावसाचीही एण्ट्री होण्याची शक्यता असल्यामुळे साऱ्यांनीच हा ऍटमबॉम्ब फुसका ठरू नये म्हणून देव आतापासून पाण्यात ठेवलेयत.

सामन्याची इतकी क्रेझ आहे की, पूर्वसंध्येलाच अवघं मेलबर्न फुल्लं झालंय. पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढण्यासाठी रोहितसेनेने तीन दिवस कसून सराव केलाय. त्यामुळे रविवारच्या दुपारी क्रिकेटप्रेमींना एक थ्रिलर-सस्पेन्स-ऍक्शनपॅक्ड ड्रामा पाहायला मिळणार हे पक्के आहे.

Spread the love