देशातल्या विविध राज्यांत निवडणुकांचे वारे वाहत आहेत. हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये विधानसभा तसंच उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रात देखील मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यांसह राज्यभरातील महानगर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यातील मुंबई आणि ठाण्याची निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
निवडणुकांच्या तयारीला लागा, निवडणूक जिंकण्यासाठीच मैदानात उतरा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. शिवसेना भवन येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवेळी ते बोलत होते. या बैठकीला शिवसेनेचे आमदार, माजी आमदार, माजी खासदार, नगरसेवक आणि विधानसभेचे उमेदवार उपस्थित होते. या बैठकीनंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
सर्वच राजकीय पक्षांच्या निवडणुकीसाठी तयारीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या संदर्भात बैठक घेत निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. सिनेटपासून ते इतर सर्व निवडणुकीत कसं काम करायचं याचं मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी केलं, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली. महापालिका आपल्याकडेच राहणार आहे. त्यामुळे जिंकण्यासाठीच आपण मैदानात उतरू. तसेच निवडणुकीच्या कामांची तयारी करताना एकमेकांशी समन्वय साधा. एक दिलाने काम करा. काही अडचणी आल्यातर वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधा. गाफील राहू नका, असा सल्ला देत, वॉर्ड पुनर्ररचनेची चिंता करू नका. ज्याची सत्ता आहे, ते वॉर्ड पुनर्रचना करणारच. पण तुम्ही कामाला लागा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.











