जळगाव तालुक्यात खळबळ; तीन ते चार जणांनी मिळून भावाचा घात केल्याचा नातेवाईकांचा आरोप, पोलिसांकडून तपास सुरू
जळगाव प्रतिनिधी : जळगाव तालुक्यातील आसोदा ते भोलाणे रस्त्यावर शेताकडे जाणाऱ्या मार्गावरील खड्ड्यात दुचाकीसह ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गलू देवीदास कोळी (रा. भोलाणे, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, मृताच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गलू देवीदास कोळी हे १० नोव्हेंबर रोजी घरातून बाहेर पडले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यानंतर नातेवाईकांनी रात्री १० वाजेपर्यंत त्यांचा परिसरात तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू होता.
दरम्यान, शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी आसोदा-भोलाणे रस्त्यावरील शेताकडे जाणाऱ्या मार्गावरील एका खड्ड्यात दुचाकीसह गलू कोळी यांचा मृतदेह आढळून आला. ही माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
नातेवाईकांकडून घातपाताचा गंभीर संशय
गलू कोळी यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, हा केवळ अपघात नसून त्यामागे घातपात असण्याची शक्यता असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. तीन ते चार जणांनी मिळून आपल्या भावाचा घात केला असावा, असा गंभीर आरोप मृताचे भाऊ मनोज कोळी यांनी केला आहे. त्यामुळे या घटनेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मृत्यूचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान
गलू कोळी यांचा मृत्यू नेमका अपघातामुळे झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या घातपाताच्या संशयाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. घटनास्थळाची परिस्थिती, दुचाकीची अवस्था आणि वैद्यकीय तपासणी अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
सध्या जळगाव तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे भोलाणे आणि परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुणाच्या मृत्यूमागील नेमके सत्य कधी समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












