जळगाव शहरात गोवरचे 11 रुग्ण; लसीकरण करून घेण्याचे अवाहन

0
49

राज्यात असलेली गोवरची साथ आता जळगाव शहरातही आली आहे. शहरातील एका भागात तब्बल अकरा रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या दवाखाना विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम लावलाणी यांनी दिली.

मात्र, या रुग्णांची प्रकृती चांगली असून, उपचारानंतर ते घरीच आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. संबंधित भागात लसीकरण न झालेल्या मुलांचे लसीकरण सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. शहरातील नागरिकांनी आपल्या लहान मुलांना लसीकरण करून घ्यावे, असे अवाहनही त्यांनी केले आहे.

गोवरची लक्षणे

लहान मुलांना ताप आणि पुरळ उठते. लहान मुलांना अशी लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत व आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी. त्यामुळे संशयित रुग्णांचे लाळ व रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविता येतील. आशा स्वयंसेविका व परिचारिकांनी नागरिकांनी सहकार्य करावे. सर्व धर्मगुरू, पंडित, पुजारी, मौलाना, पादरी यांनीही आपल्या परिसरातील लहान मुलांचे लसीकरण करून घेण्यासाठी जनजागृती करावी. महपालिकेच्या सर्व दवाखान्यात औषधी उपलब्ध करून दिली आहे. जनतेने पूर्ण माहिती घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे अवाहनही बैठकीत करण्यात आले.

आयुक्तांनी घेतली बैठक

जळगाव महापालिकेत नव्याने नियुक्त झालेले आयुक्त देवीदास पवार यांनी महापालिका दवाखाना विभागाची बैठक घेतली. यात गोवर साथीबाबत जळगावातील स्थितीची माहिती त्यांनी घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सांगितले, की शहरात गोवरच अकरा रुग्ण आढळले आहेत. ज्या भागात लसीकरणाला नकार देण्यात येतो, त्या भागातील हे रुग्ण आहेत. रुग्ण आढळून आलेल्या भागात दवाखाने विभागातर्फे सर्व्हे सुरू आहे. डब्लूएचओचे सल्लागार डॉ. प्रकाश नांदापुरकर यांनी लसीकरणाची माहिती दिली. दवाखाना विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील गोराणे उपस्थित होते.

”ज्या मुलांना गोवरची लस दिलेली नाही, त्या मुलांना गोवरची लस महापालिका वैद्यकीय विभागातर्फे देण्यात येत आहे. काही भागात नागरिक लसीकरण करण्यास नकार देत आहेत, त्या ठिकाणी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. लसीकरण झालेल्या मुलांना अधिकचा डोस देण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून आदेश येईल. त्यानुसार ते लसीकरण करण्यात येईल.” -डॉ. राम रावलानी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका, जळगाव

Spread the love