सोयगाव (विशेष प्रतिनिधी) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (रोहयो) अंतर्गत सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कथित भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीनंतर पंचायत समिती प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली असून समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य’ संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष गुलाब अहमद शेख यांनी मुख्यमंत्री तसेच रोजगार हमी योजना मंत्र्यांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तालुक्यात अनेक विहिरी व गायगोठे प्रत्यक्षात अस्तित्वात नसतानाही ते पूर्ण झाल्याचे दाखवून शासकीय निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, बोगस मस्टर रोल तयार करून आणि मोजमाप पुस्तिकेत (एम.बी.) खोट्या नोंदी करून लाखो रुपयांची बिले काढण्यात आली. काही ठिकाणी कामे प्रत्यक्षात झाली नसतानाही ती पूर्ण झाल्याचे दाखवून निधी उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही शासकीय कर्मचारी आणि संबंधित घटकांच्या संगनमतातून हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, तालुक्यातील अनेक शेतकरी व मजुरांनी स्वतःच्या खर्चाने आणि व्याजाने पैसे घेऊन रोहयो अंतर्गत कामे पूर्ण केली असतानाही त्यांच्या बिलांची देयके प्रलंबित असल्याची बाबही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. याउलट, प्रत्यक्ष काम न केलेल्या व्यक्तींच्या नावाने मस्टर भरून निधी काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिल्यानंतर प्रशासन सक्रिय झाले. त्यानंतर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (म.ग्रा.रो.ह.यो.) तथा गट विकास अधिकारी, पंचायत समिती सोयगाव यांनी २४ जून २०२६ रोजी अधिकृत आदेश जारी करून चौकशी समितीची नियुक्ती केली.
चौकशी समितीतील सदस्य
अशोक एन. दौड – विस्तार अधिकारी (पंचायत)
श्री. बडवणे – कनिष्ठ अभियंता
रामेश्वर घोंगडे – कृषी विस्तार अधिकारी
सदर समितीला तक्रारप्राप्त कामांची प्रत्यक्ष पाहणी करून सखोल चौकशी अहवाल सात दिवसांच्या आत पंचायत समितीकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या चौकशीमुळे संबंधित यंत्रणेत खळबळ उडाली असून, चौकशी अहवालात नेमके काय निष्पन्न होते आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.












