शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी येथील साईबाबा मंदिर परिसरात रविवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ समोर फळ विक्रेत्या महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी दोन महिला आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मृत महिलेचे नाव जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय ३०) असे असून त्या साई मंदिर परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, फळे विकण्यासाठी जागेच्या वादातून काही महिलांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की चार ते पाच महिलांनी जयश्री क्षीरसागर यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले.
ही घटना साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ समोर भर गर्दीत घडल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी अवस्थेत जयश्री यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अंजली खांडीझोड (वय २२) आणि फिजा पटेल (वय २१) या दोन महिला आरोपींना अटक केली आहे. घटनेत इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
साई मंदिरासारख्या अत्यंत संवेदनशील आणि गर्दीच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंदिर परिसरातील हातविक्रेत्यांमधील वाद आणि वाढती दादागिरी याबाबत स्थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शिर्डी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.












