‘ बौद्ध धम्म स्थापना दिवस ‘ अर्थात आषाढ पौर्णिमा 

0
4

पौर्णिमा आणि बौद्ध धम्म यांचे अतूट नाते असल्याचे बौद्ध साहित्यातून प्रतीत होतांना दिसून येते .प्रत्येक पौर्णिमेस सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जीवनात कोणतीतरी अनन्य साधारण घटना घडलेली आपणास दिसून येते , त्यामुळे बौद्ध धम्मात पौर्णिमेस अनन्य साधारण महत्व आहे. आषाढ पौर्णिमा ही सुध्दा अशाच अनन्य साधारण घटनांची साक्षीदार राहिलेली आहे . या पौर्णिमेला बऱ्याच महत्वपूर्ण घटना घडल्या असल्याच्या नोंदी बौद्ध साहित्यात आढळतात .

भगवान गौतम बुध्द यांनी आपला उपदेश पाली भाषेतून केलेला आहे . पाली भाषा त्याकाळी सर्वसामान्य लोकांची संवाद भाषा होती . पाली भाषा एक जनभाषा म्हणून प्रचलित होती . तेंव्हा सर्वसामान्य जनतेच्या भाषेत बुद्ध आपले तत्वज्ञान सांगत असल्याने सर्वसामान्य जनतेने ते लवकर स्वीकारले , पर्यायाने बौद्ध धम्म मोठ्याप्रमाणात प्रसारीत झाला . बौद्ध धम्म हा राजधर्म म्हणून मान्यता पावला . आषाढ महिन्यास पाली भाषेत ‘ असाळह मासो ‘ असे म्हणतात त्यामुळे आषाढ पौर्णिमा हा दिवस ‘ पाली भाषा दिन ‘ म्हणूनही साजरा केला जातो . ‘ त्रिपिटक ‘ हे बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ असून ते सर्व ग्रंथ पाली भाषेतच असल्याने या भाषेला अनन्यसाधारण महत्व आहे . या भाषेचे महत्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने या वर्षी या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे .

सिद्धार्थ गौतम यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य वंशीय राजे होते व त्यांची राजधानी कपिलवस्तू होती . शाक्य वंशाचे लोक आषाढ पौर्णिमा हा दिवस सर्वात मोठा आनंदाचा दिवस म्हणून साजरा करत आले होते . त्यांचेत या पौर्णिमेस पूर्वापार अनन्य साधारण महत्व होते , वर्षातील सर्वात मोठा सण ते याच दिवशी साजरा करत असत . हा सण सलग सात दिवस साजरा केला जात असे. राजा शुद्धोधन व त्यांचे सारे राजदरबारी सुद्धा यात सहभागी होत असत . अश्याच एका आषाढ पौर्णिमेस सण साजरा केल्या नंतर रात्रीला राणी महामाया , ( गौतम बुद्ध यांची माता ) यांना एक स्वप्न पडते , या स्वप्नात सुमेध नावाचा बोधिसत्व महामायेस तू माझी माता होण्यास तयार आहे का ? असा प्रश्न विचारतो . महामाया त्यास ‘ हो ‘ म्हणून उत्तर देते . या स्वप्नाचा अर्थ विचारण्या करिता राजा शुद्धोधन ८ स्वप्नतज्ञ लोकांना निमंत्रित करतात , तेंव्हा ते स्वप्नतज्ञ लोक राजाला सांगतात की , ” तुला एक असा पुत्र होईल की , जर तो संसारात राहिला तर सम्राट होईल व संसारात्याग करून राहिला तर सम्यक संबुद्ध होईल .” पुढं सिद्धार्थ संसारत्याग करून बुद्ध झाल्याने बौद्ध साहित्यात या स्वप्नाला अनन्यसाधारण महत्व आहे .

वयाच्या २० व्या वर्षी सिद्धार्थ गौतम हे शाक्य संघाच्या नियमानुसार शाक्य संघाचे सदस्य ( खासदार ) बनतात ९ वर्षांनी जेंव्हा शाक्य संघात रोहिणी नदीच्या पाण्यावरून जी चर्चा होते त्यात खासदार गौतम आपले मत संघाच्या मताच्या विरुध्द मांडतात त्यामुळे संघ सेनापती त्यांचे मत अमान्य करतो व गौतमास आपले विचार संघाच्या बाजूने देण्याविषयी दबाव टाकतो . गौतम त्या दावावास बळी न पडता आपल्याच मतावर ठाम राहतात , तेंव्हा संघ सेनापती त्यांना शिक्षा सूनावतो , संघाने दिलेल्या शिक्षे प्रमाणे गौतम आषाढ पौर्णिमा ई . स. पूर्व ५३४ ला गृहत्याग करतात .

गृहत्याग केल्या नंतर सिद्धार्थ गौतम हे मानवी कल्याणाचा मार्ग काय असू शकतो ? याचा शोध घेतात . या करिता ते आलार कालाम , उद्दक रामपुत्त व काही विद्वान लोकांना भेटतात . त्यांची तत्वे समजून घेतात . त्यांच्या तत्वांनी , कार्यपद्धतीने त्यांचे समाधान होत नाही म्हणून ते ध्यानसाधना करतात , तेंव्हा अन्य ५ तपस्वी त्यांच्यासोबत ध्यानसाधना करावयास बसतात . कठोरात कठोर ध्यानसाधना केल्याने त्यांच्या शरीरातील सारा त्राण निघून जातो . ते मरणासन्न अवस्थेस पोहचतात तेंव्हा ही ध्यानसाधना अशीच चालू ठेवली तर मला मानवी कल्याणाचा मार्ग मिळणार नाही या विचाराने ते सुजाता नामक महिलेने आणलेली खीर प्राशन करतात . मात्र , त्यांनी अन्न सेवन केले म्हणून त्यांचे पाचही सहकारी ( तपस्वी ) त्यांची अवहेलना करतात , त्यांना दूषण देवून रागा रागाने त्यांची साथ सोडून इतरत्र निघून जातात . गौतम हे एकटेच उरुवेला येथे ध्यानसाधना करू लागतात . वैशाख पौर्णिमा ई. स. पूर्व ५२८ ला त्यांना ज्ञानप्राप्ती होते व सिद्धार्थ गौतम आता बुद्ध म्हणून ओळखले जातात .  आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान लोकांना सांगावे की नाही सांगावे , सांगावे तर कोणाला सांगावे , जनतेला माझे ज्ञान समजेल की नाही , समजले तर ते प्रत्यक्षात आणतील की नाही , त्यांनी प्रत्यक्षात आणले नाही तर त्यांनाही त्रास होईल व माझेही कष्ट वाया जातील असे एक ना अनेक प्रश्न ते स्वतःलाच विचारतात . शेवटी आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान लोकांना सांगावे असा ते निर्णय घेतात . तेंव्हा सर्वप्रथम ते आलार कालाम यांना सांगावे म्हणून त्यांची माहिती घेतात मात्र त्यांचे निधन झाले असल्याचे त्यांना समजते . या नंतर ते उद्दक रामपुत्त यांना सांगावे म्हणून त्यांची माहिती घेतात तर ते आठ दिवसा आधीच मरण पावले आहेत अशी त्यांना माहिती मिळते . या नंतर ते त्यांना सोडून गेलेल्या त्यांच्या पाच सहकाऱ्यांची माहिती घेतात. ते सारनाथ येथील मृगदाय वनात तपश्चर्या करीत असल्याचे त्यांना समजते . तेंव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध त्यांच्या भेटी करिता सारनाथ येथील मृगदाय वनात जातात. सिद्धार्थ गौतम बुद्ध सुरवातीस त्यांना त्यांचे क्षेम कुशल विचारतात . त्यानंतर ते पाच तपस्वी बुद्धाला ” तपश्चर्येवर तुमचा अजून विश्वास आहे का ?” असा प्रश्न करतात तेंव्हा बुद्ध त्यांना सांगतात , जगात दोन प्रकारचे तत्वज्ञान आहे , एक तत्व आहे ‘ खा प्या मजा करा . कारण उद्या आपण मरणारच आहोत , तर दुसरे तत्व आहे , सर्व वासना मारून टाका . कारण त्या पूनर्जन्माचे मुळ आहे .” हे दोन्ही तत्व मानवाला शोभणारे नाही माझा या दोन्ही तत्वांवर व तपश्चर्येवर विश्वास नाही . हे ऐकून ते तपस्वी तुम्ही कोणता मार्ग शोधून काढला ते आम्हास सांगावे . असे म्हणतात , तेंव्हा भगवान बुध्द त्यांचे पहिले प्रवचन देतात . तो दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा ई. स. पूर्व ५२८ होय.

या प्रवचनात ते त्री सरण , पंचशिल , आर्य अष्टांगिक मार्ग , चार आर्य सत्य , दस पारमिता , दुःख निर्मिती , दुःख निवारण्याचा मार्ग व अन्य तत्व सांगतात व हाच बौद्ध धम्म आहे , मानवी कल्याणाचा आदी , मध्यम व अंतिम मार्ग आहे असे स्पष्ट सांगतात . त्यांच्या या धम्म प्रवचनाने कौंडिण्य , अश्र्वजित, कश्यप , महानाम , भद्दीक हे पाचही तपस्वी प्रभावित होतात . भगवान बुध्द यांचे विषयी त्यांच्या

मनात एवढा आदर निर्माण झाला की , ते बुद्धाला शरण गेले व आपण आमचा शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी त्यांनी याचना केली . गौतम बुद्ध यांनी त्यांना शिष्यत्व प्रदान केले . आणि इथेच धम्म आणि संघाचा उदय झाला . दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी सकाळी वाराणशी येथील राजपुत्र यशस् यास बुद्ध दर्शन झाले . बुद्ध तेजाने तो प्रभावी झाला आणि त्याने आपले नैराश्य बोलून दाखविले तेंव्हा बुद्ध त्यास उपदेश करतात . त्या उपदेशाने प्रभावी होऊन यशस् त्याच्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारतो.  सर्वप्रथम भिख्खू झालेले हे पाच भिख्खू ‘ पंच वग्गिय भिख्खू ‘ म्हणून बौद्ध साहित्यात प्रचलित आहेत . हे सर्वप्रथम गौतम बुद्ध यांचे शिष्य झाले असल्याने गुरू शिष्य परंपरा सुध्दा याच पौर्णिमे पासून सुरू झाली . याच दिवसापासून जगात एका धर्माचा , एका गुरूचा , एका धर्म संस्थापकाचा , एका संघाचा , एका मानवी मूल्याचा उदय झाला . जगातील सर्वात मोठी क्रांती याच दिवशी ( आषाढ पौर्णिमा ई. स .पूर्व ५२८ ) झाली .

जगात जेवढे धर्म उदयास आले त्यात सर्वप्रथम बौद्ध धर्माचा उदय झाल्याचे यातून दिसून येते . ( बौद्ध धर्माच्या आधी भारतात वैदिक परंपरा होती . या परंपरेस वैदिक संस्कृती सुद्धा म्हणतात . ) आषाढ पौर्णिमा हा दिवस बौद्ध धम्माचा स्थापना दिवस आहे हे सर्वश्रुत आहे , बहुतांश देशात आषाढ पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करतात , बौद्ध जनता सुध्दा आषाढ पौर्णिमा साजरी करतात . बौद्ध जनतेने हा दिवस ‘ बौद्ध धम्म स्थापना दिवस ‘ म्हणूनही साजरा केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल .बौद्ध भिक्खू या दिवसा पासून तीन महिने एकाच विहारात थांबून वर्षावास ( पावसाळी मुक्काम ) करतात , विहारातच धर्मोपदेश करतात . वर्षावासाची ही परंपरा याच दिवसा पासून सुरू झाली. पहिला वर्षावास गौतम बुद्ध यांनी सारनाथ येथील मृगदाय वनातील मलगंध कुटीत केला .

आषाढ पौर्णिमा या दिवशी निव्वळ पौर्णिमा म्हणून साजरी न करता भिक्खू संघाने , उपासकांनी बौद्ध धम्म स्थापना दिनानिमित्त पुढाकार घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले , हा दिवस एक सण म्हणून साजरा केला , भिख्खू संघाने विहारावर रोषणाई केली तर अधिक संयुक्तिक ठरेल. जळगाव शहरात गेल्या तीन वर्षांपासून प्रामुख्याने अजिंठा हाउसिंग सोसायटी मध्ये ‘ बौद्ध धम्म स्थापना दिवस ‘ साजरा करण्यात येत आहे . ही एक सरवात आहे.

लेखक जयसिंग वाघ 

अजिंठा हाउसिंग सोसायटी, अजिंठा चौक , जळगाव 

संपर्क …….. ९८८१९२८८८१

 

Spread the love