केऱ्हाडा येथे २४ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

0
2

वादातून ब्लेंडर मशीनच्या कटरने गळ्यावर वार केल्याचा आरोप; संशयित पोलिसांच्या ताब्यात

रावेर : तालुक्यातील केऱ्हाडा गावातील इंदिरानगर परिसरात २४ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेंद्र रवींद्र कापडे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र कापडे आणि रामसिंग भिल्ल यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संतापाच्या भरात रामसिंग भिल्ल याने ब्लेंडर मशीनच्या कटरने राजेंद्र कापडे यांच्या गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात राजेंद्र गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर राजेंद्र यांना तातडीने उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित रामसिंग भिल्ल याला ताब्यात घेतले असून, खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला, वादाचे मूळ काय होते तसेच या घटनेमागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास सुरू आहे.

पोलिसांच्या पुढील तपासानंतर या हत्येचे नेमके कारण आणि घटनेमागील संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.

Spread the love