आई, तुला नाही का गं आम्हाला मारून टाकावसं वाटलं?”; वैजापूरच्या घटनेनंतर अभिनेत्री मिनाक्षी राठोडची पोस्ट चर्चेत

0
56

औरंगाबाद -प्रेमविवाह केला म्हणून राग मनात धरत सख्या भावाने सोबत आणलेल्या कोयत्याने वार करत बहिणीचं शिर धडावेगळे केलं. अंगावर शहारा आणणारी ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात घडली होती. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या हत्याकांडानंतर अल्पवयीन भाऊ आणि आई दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर सोशल मीडियावर आंतरजातीय लग्न आणि प्रेमविवाहाबद्दल बऱ्याच चर्चा सुरू झाल्या. यातच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील अभिनेत्री मीनाक्षी राठोडची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

मिनाक्षी लिहिते, “मोठ्या ताईचं आंतरजातीय लग्न झालं, तेव्हा लोकांनी खूप त्रास दिला तुला. तुला किती राग आला असेल ना ताईचा. मी कैलाश सोबत आंतरजातीय लग्न केलं तेव्हा तर लोकांनी तुला त्यांच्यात गृहीत धरणं सोडलं होतं. किती किती राग आला असेल ना तुला माझा. पण कायम उसाचे पाचड अंगाखांद्यावर बाळगणारा तांडा आणि पुढारल्या पणाचे सोंग मिरवणारी आपली शहरातली कॉलनीही तुझ्या एका स्वीकाराने तुझ्या सोबत ऊभी राहीली!

काल परवा आपल्या लहान मुलीचं ही आंतजातीय लग्नं मोठ्या थाटात लावून दिलंस आणि सगळ्यांनाच जणू हीच कशी नवीन रीत आहे हे सांगून दिलंस! हे स्विकाराचं बीज तुला कुठे गवसलं? आपल्याला ५ मुली असतांना सुद्धा एवढं कसं तू स्वतःला सांभाळलंस! राग कसा गं कंट्रोल केलास? ते ही पप्पा नसतांना, तुला नाही का गं आम्हाला मारून टाकावसं वाटलं?

हे असंच कीर्ती थोरेच्या आईला का नाही वाटलं. एवढं राग अनावर होत असतो का प्रतिष्ठे पाई? तिने तर जातितच लग्न केले होते. तुझ्या एवढं नाई फक्त एकाच मुलीला स्वीकारायचं होते तिला. पोटच्या मुलीचा इतक्या अमानुषपणे खून करावसं वाटणं या पेक्षा क्रूर काय असू शकतं या जगात. काश माझ्या सारखी आई कीर्तीला लाभली असती तर? आणि हो! स्वप्निल शुभम सारखे भाऊ ही! या बेगडी प्रतिष्ठेच्या बंजर जमिनीवर तुझ्या स्विकाराचं बियाणं सापडूदे आई!

काल परवाच सकारात्मक वाटणारी, तुझ्या वाढदिवशी लिहिलेली ही पोस्ट, आज ही घटना एकूण अस्वस्थ करणारी आहे. सगळ्या चिंता, रुढी परंपरांना झुगारून हा जो स्वॅग तू स्वीकारला आहेस याने तुझ्या लेकरांचे आयुष्य सुखी झाले आहेत. तुझ्यातल्या या सकारात्मक बदलाने आजूबाजूची परिस्थिती कुस बदलतेय! हा स्वॅग खऱ्या अर्थाने तुलाच शोभून दिसतो! जो प्रत्येक स्त्री मधे येवो!”

अभिनेत्री मिनाक्षी राठोडने या पोस्टसोबत किर्ती थोरेचा एक फोटो शेअर केलाय. सोबतच तिचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. मिनाक्षीने घरातील आंतरजातीय लग्न तिच्या आईने जेवढ्या खुलेपणाने स्वीकारली, त्यासाठी आईचं कौतुक केलंय. अभिनेत्री मिनाक्षी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारत आहे.

Spread the love