प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या वराडसीम येथील घरकुलांच्या सर्वेक्षणात कमी लाभार्थ्यांची नावे आल्याने पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी येथील पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
या बाबत माहिती अशी की , वराडसीम व जोगलखोरी येथील घरांचे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २०२४ मध्ये मोबाईल ॲपव्दारे सर्वेक्षण करण्यात येऊन जवळपास ८५० च्या वर नावे असलेल्या लाभार्थ्यांचा सर्वे झालेला होता. मात्र आता ग्रामपंचायत कार्यालयाला प्राप्त झालेल्या यादीत वराडसीम २८४ तर जोगलखोरी ४५ अशी लाभार्थ्यांची नावे आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून घरकुलांची खरोखर गरज असलेल्या ग्रामस्थांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे सन २०२४ मध्ये झालेल्या सर्वेक्षणाची माहिती मिळावी असे निवेदनात म्हटले आहे. वराडसीम ग्रामपंचायत चे पदाधिकारी गटविकास अधिकारी पंचायत समिती भुसावळ यांना निवेदन देण्यासाठी गेले असता गटविकास अधिकारी मिटींग मध्ये असल्याने सहाय्यक गटविकास अधिकारी डी. जी. जाधव यांनी निवेदन देण्यात आले यावेळी वराडसीम ग्रामपंचायत चे सरपंच सौ निलप्रभा उमेश पाचपांडे , सदस्य विलास पाटील , शरद सपकाळे , इरफान खाटीक , प्रकाश ठाकूर , भास्कर पाटील , रविंद्र पारधी , विजय रविंद्र पाटील , सामाजिक कार्यकर्ते उमेश पाचपांडे उपस्थित असल्याचे विलास पाटील यांनी कळविले आहे.












