औरंगाबाद -ऑल इंडिया मुस्लीम इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादहून मुंबईला येत असलेल्या तिरंगा रॅलीत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. नवी मुंबईत वाशीजवळची परिस्थिती पाहून मी खासदार आहे की दहशतवादी असा प्रश्न पडल्याचं मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं. तसेच पोलिसांनी मुंबईला जाण्यासाठी गाड्यांवरील तिरंगा झेंडा काढण्यास सांगितल्याचा आरोप जलील यांनी केला. ते मुंबईत आयोजित तिरंगा रॅलीच्या सभेत बोलत होते.
इम्तियाज जलील म्हणाले, “तिरंगा रॅलीत वाशीजवळ हद्द झाली. आम्ही या रॅलीत आमच्या पक्षाचा झेंडा लावून आलो नाही. आम्ही हिरवा, निळा, भगवा, पिवळा झेंडा लावला नव्हता. आम्ही या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा गाडीला लावून ही तिरंगा रॅली मुंबईला घेऊन आलो. तो तिरंगा ज्याचा आम्ही आदर करतो. या तिरंग्यावर आम्हाला अभिमान आहे. मात्र, वाशीजवळ नवी मुंबईत आलो तेव्हा आमच्या गाड्या अडवण्यात आल्या. तिथं इतका पोलीस फौजफाटा होता की मला शंका आली मी खासदार आहे की कोणी दहशतवादी आहे ज्याच्यासाठी एवढे पोलीस वाट पाहत होते.”












