जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून दुपारचे तापमान प्रचंड वाढले आहे. सकाळी अकरा वाजेपासूनच बाहेर उन्हाची तीव्रता जाणवत आहे. दिवसभर सूर्य जणू आग ओकत असल्याने जळगावातील रस्ते दुपारी निर्मनुष्य होत आहे. आज दि.30 मार्च रोजी जळगाव , भुसावळचा पारा 44.2 अंशावर पोहोचला आहे. अजून तीन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
पंजाब, गुजरात, राजस्थानकडून खान्देशच्या दिशेने उष्ण वारे वाहत आहेत. त्यामुळे आगामी तीन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच यंदा तापमानात प्रचंड वाढ झाली.बुधवारी जळगाव, भुसावळचा पारा 44.2 अंशावर तर अमळनेर,जामनेर, धरणगाव, एरंडोल, पाचोरा, रावेर वरणगाव या ठिकाणी पारा 44अंशावर पोहोचला आहे. त्याखालोखाल भडगाव, चोपडा, मुक्ताईनगर,पारोळा येथे 43अंशावर पारा नोंदविला गेला.
बोदवड येथे 42 अंश तर चाळीसगाव येथे 40 अंशाची नोंद झाली आहे.आगामी तीन दिवस जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार असल्यामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वेलनेस फाउंडेशनच्या अभ्यासकांनी वर्तवली आहे.
मागील चार ते पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सकाळी नऊ वाजेपासूनच शरीराला उन्हाचे चटके जाणवत आहे. दुपारच्या वेळी तर दुचाकीवर फिरताना अक्षरश: आगीच्या ज्वालामधून दुचाकी जात आहे की काय, अशी परिस्थिती होत आहे. दरम्यान, मार्च महिन्यातच तापमान 44.2 अशं इतके वाढले आहे तर आगामी एप्रिल व मे महिन्यात काय परिस्थिती राहील, या विचारानेच जळगावकरांसह जिल्हावासिय चिंतेत पडले आहे.
मागील पंधरवड्यापासून किमान तापमान स्थिर आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून तापमानाचा आलेख चढता आहे. बुधवारी जिल्ह्याचा पारा 44.2 अंशसेल्सिअसवर पोहोचला आहे. दि. 1 ते 2 एप्रिलपासून उष्णतेच्या तीव्रतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तीन ते चार एप्रिलपर्यंत किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज वेलनेस फाउंडेशनने वर्तविला आहे.












