कापूस उत्पादक शेतकरी कापसाच्या दराविषयी संभ्रमावस्थेत आहेत. कापसाचे दर दहा हजारांचा टप्पा पार करून शेतकऱयांसाठी फायदेशीर ठरतील, अशी अपेक्षा असतानाच कापूस दरात रोज चारशे ते पाचशे रुपयांची होत असलेली घट शेतकऱयांसाठी धोकादायक ठरत आहे.
कापूस दरावर शासनाने अंकुश ठेवण्याची गरज असताना व्यापारी कमी भावात शेतकऱयांकडून कापूस खरेदी करीत आहेत. शेतकऱयांना सध्या शेतीसाठी व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैसे उपलब्ध करत असताना आपला सोन्यासारखा कापूस कमी दराने विकावा लागत आहे. यात व्यापारी मालामाल झाल्याचे दिसून येत आहे. नगर जिह्यात यावर्षी कापसाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात वाढले. मात्र, परतीच्या पावसाने जास्त नुकसान कापूस पिकाचे झाले. त्यामुळे कापूस उत्पादनावर मोठा परिणाम झाला. परिणामी कापसाचे उत्पादन कमी झाले. मात्र, भाव चांगला मिळून उत्पादन खर्च निघून जाईल, या आशेवर शेतकरी होते. मात्र, दररोज दरात होणारी घट पाहून शेतकरी नाराज होत आहेत.
शेतकऱयांनी शेतातील कापूस वेचून दर वाढण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवला आहे. पण दर सतत कोसळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यात वेचलेल्या कापसाचे वजन निम्म्याने घटले आहे. कापूस वेचणीसाठी प्रतिक्विंटल जवळपास पंधराशे ते सोळाशे रुपये खर्च आला आहे. शेवटच्या वेचणीला तर भाव प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांपर्यंत गेला होता. आता कापसाचे वजन घटत असून, भाव मिळत नसल्याने खर्च तरी वसूल होईल की नाही, याचीच चिंता शेतकऱयांना लागली आहे.
सरकारने दराबाबत दिलासा द्यावा
कापसाचे दर वाढण्याचे चिन्ह सध्या तरी दिसत नाही. शेअर बाजारप्रमाणे कापसाचे दर दररोज खाली जात आहेत. शेतकऱयांना पैशांची आवश्यकता असताना कापूस कमी दराने विकावा लागत आहे. ऑक्टोबर व डिसेंबरच्या सुरुवातीला कापूसदर साडेनऊ हजार रुपयांपर्यंत होते, त्या भावात आणखी सुधारणा होऊन दहा हजार रुपये टप्पा पार होईल, अशी अपेक्षा असताना दर कोसळत गेले आणि आजअखेर प्रतिक्विंटल सात हजार सहाशे रुपयांचा दर कापसाला मिळत आहे. त्यामुळे सरकारने कापूसदराविषयी लक्ष केंद्रित करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.











