नवनीत राणा यांना कोर्टाचा झटका, बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

0
49
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. अडचणीत वाढ झाली आहे. बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात दाखल केलेला दोषमुक्ततेचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

राणा यांच्या अर्जावर दोन्ही बाजूकडील युक्तीवाद सोमवारी 12 डिसेंबर रोजी पूर्ण झाला. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नवनीत राणा व त्यांच्या वडिलांच्या दोषमुक्ततेचा निर्णय राखून ठेवला.

नवनीत राणा यांनी 2019ची लोकसभा निवडणूक राखीव कोटयातून लढवण्यासाठी बोगस कागदपत्रे बनवून अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात नवनीत राणा व त्यांचे वडील हरभजन सिंग रामसिंग पुंडलेस यांच्याविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दोघांनी सुरुवातीला शिवडीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता. तेथे दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळल्यानंतर दोघांनी सत्र न्यायालयात दाद मागितली आहे. याप्रकरणी सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे झालेल्या सुनावणीवेळी सरकारी पक्षातर्फे अॅड. सुमेश पांजवानी यांनी, तर नवनीत राणा यांच्यातर्फे अॅड. शब्बीर शोरा यांनी युक्तीवाद केला. यावेळी मुलुंड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन चंद्रमोरे हजर होते. दोन्ही बाजूकडील युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी 21 डिसेंबरला निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले.

Spread the love