नंदुरबार जिल्ह्यातील शहादाजवळ बुधवारी गरोदर मातांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाला. शहादाजवळील लोणखेडा कॉलेजच्या गेटसमोर ही घटना घडली. ही घटना घडली तेव्हा रुग्णवाहिकेमध्ये 11 गरोदर माता होत्या. सुदैवाने या अपतामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातात जखमी झालेल्यांना शहादा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा शहादा जवळील लोणखेडा कॉलेजच्या गेटसमोर अपघात झाला. रुग्णवाहिका उलटल्याचे कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी रुग्णवाहिकेतून रुग्ण आणि गरोदर मातांना बाहेर काढले.
दरम्यान, रुग्णवाहिकेचा वेग अधिक होता आणि त्यामुळे लोणखेडा कॉलेजच्या गेटसमोर चालकाचे रुग्णवाहिकेवरील नियंत्रण सुटले. यामुळे रुग्णवाहिका उलटली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.











