उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडले मोठे घबाड;जळगाव एसीबी ची मोठी कारवाई

0
2

जळगाव -: येथील सहकारी संस्था विभागाचे उपनिबंधक जगदीश बाबूराव बारी यांच्या लॉकरमध्ये तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५९ रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत सोने-चांदीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली.

नाशिक-जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जगदीश बाबूराव बारी (वय ५६) हे सहकारी संस्था, जळगाव येथे उपनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. तपासादरम्यान आरोपी बारी यांच्या एका बँकेतील लॉकरची झडती घेण्यात आली. या झडतीत मोठ्या प्रमाणात मौल्यवान ऐवज मिळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ६६०.३३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगड्या, बिस्कीट आदी दागिने, ज्यांची किंमत १ कोटी ११ हजार ९६० रुपये, तसेच १०.५०० ग्रॅम वजनाची चांदीची दागिने किंमत २६ हजार २५९ रुपये आणि ८ लाख ३६ हजार ५०० रुपयांची रोकड यांचा समावेश आहे. रोकडीत प्रामुख्याने ५०० रुपयांच्या नोटा असल्याचेही तपासात समोर आले आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने यापूर्वी केलेल्या सापळा कारवाईनंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्यासह एसीबीच्या पथकाने केली. या संपूर्ण कारवाईला नाशिक परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. या धाडीनंतर सहकार विभागात एकच खळबळ उडाली असून, तपास यंत्रणा आता या संपत्तीचा स्रोत आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करत आहे.

Spread the love