केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (KSCPCR) राज्यातील सर्व शाळांना शालेय शिक्षकांना त्यांचे लिंग विचारात न घेता, ‘सर’ किंवा ‘मॅडम’ ऐवजी ‘टीचर’ म्हणून संबोधित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना संबोधित करण्यासाठी ‘सर’ किंवा ‘मॅडम’ सारख्या सन्मानार्थी शब्दांपेक्षा ‘टीचर’ हा अधिक लिंग-तटस्थ शब्द आहे, असे केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पॅनेलने निर्देशित केले आहे.
KSCPCR च्या आदेशात ‘सर’ आणि ‘मॅडम’ असे शब्द बोलणे टाळण्याचाही उल्लेख केला आहे.
पॅनेलचे अध्यक्ष केव्ही मनोज कुमार आणि सदस्य सी विजयकुमार यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने बुधवारी शिक्षण विभागाला राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘टीचर’ हा शब्द वापरण्याच्या सूचना देण्याचे निर्देश दिले.
बाल हक्क आयोगाने असेही मत व्यक्त केले की सर किंवा मॅडम ऐवजी ‘टीचर’ म्हणून संबोधल्यास सर्व शाळांमधील मुलांमध्ये समानता टिकून राहण्यास मदत होईल आणि शिक्षकांबद्दलची आत्मीयताही वाढेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांना त्यांच्या लिंगानुसार ‘सर’ आणि ‘मॅडम’ संबोधताना भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर विचार करताना हे निर्देश देण्यात आले.











