काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रावण असा उल्लेख केला आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी ट्विटरवर मोदींचा रावण उल्लेख केला, तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.
रावणासारखे मोदी धार्मिक असल्याचा दावा करून उत्तराखंडमध्ये वाराणसीप्रमाणे मंदिरं पाडत आहेत किंवा बळकावत आहेत. आता ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून पंढरपूरच्या पवित्र स्थळांची नासधूस करण्यासाठी योजना आखत आहेत. त्यामुळे हा नरसंहार रोखण्यासाठी लवकर मी मुंबई उच्च न्याायलयाचा दरवाजा ठोठावणार आहे, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
पंढरपूर विकासाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने पंढरपुरात उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर करण्याचे निश्चित केले आहे. मात्र या कॉरिडॉरमध्ये मंदिर परिसर व प्रदक्षिणामार्गाच्या आतील सुमारे पाचशेहून अधिकची घरे भूसंपादित होण्याची शक्यता असल्याने पंढरपूर कॉरिडोरला विरोध होत आहे. विराट हिंदुस्थानचे अध्यक्ष डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील यास कडाडून विरोध केला आहे.
दरम्यान, पंढरपूर कॉरिडोर योजना राबवण्यासाठी अहिल्याबाई होळकर आणि बायजाबाई शिंदे निर्मित राम आणि कृष्ण मंदिर तोडले जाणार आहे. यामुळे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी नाराज आहेत. त्यामुळे आता याविरोधात त्यांनी न्यायालयाची पायरी चढण्याचा निश्चय व्यक्त केला आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनीही मोदींचा रावण उल्लेख केलेला
Modi like Ravan while claiming to be religious is demolishing or grabbing temples as in Varanasi, in Uttarakhand, and now we find he is planning with Fadnavis to destruct the holy sites of Pandharpur. Hence I am approaching High Court in Mumbai soon to stop this carnage.
— Subramanian Swamy (@Swamy39) December 10, 2022
गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारादरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधान मोदींचा रावण असा उल्लेख केला होता. अहमदाबादच्या बेहरामपुरा येथे सभेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींची रावणाशी तुलना केली होती. तुमचा (मोदींचा) चेहरा महापालिका निवडणूक, विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीतही दिसतो, तुमच्याजवळ रावणासारखे 100 डोकी आहेत का? असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला होता.











