जळगाव : जळगाव–ममुराबाद–विदगाव–किनगाव–इंदोर राज्य महामार्ग क्र. ४२ वरील सुरू असलेल्या रस्ते विकास कामामध्ये गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मंजूर आराखड्याचे उल्लंघन, निकृष्ट दर्जाचे काम तसेच नागरिकांच्या सुरक्षेकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
सदर रस्त्याच्या कामादरम्यान मुख्य महामार्गाला जोडणाऱ्या विविध अंतर्गत रस्त्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिवळी माती टाकण्यात आली आहे. यामध्ये मुख्य प्रवेशद्वारापासून गावात जाणारा रस्ता, असोदा जाणारा रस्ता, सुजदे गावाचा रस्ता, नांद्रा गावाचा रस्ता तसेच नांद्रा रस्त्यापासून खंडेराव मंदिराकडे जाणारा रस्ता या प्रमुख जोड रस्त्यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी रस्त्याच्या खाली उतरण्यासाठी टाकण्यात आलेली पिवळी माती सध्या मोठ्या प्रमाणात फपुटा झालेली दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांतच पावसाळा सुरू होणार असल्याने पावसाचे पाणी या मातीमध्ये मिसळून मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने घसरून अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस व पावसाळ्यात या ठिकाणी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांनी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे याबाबत वारंवार तक्रारी केल्या असता, “वो हमारा काम नही है, हम वहाँ कुछ नहीं डाल सकते, आपको जहाँ जाना है वहाँ जाओ,” असे उद्धट उत्तर संबंधित कर्मचाऱ्यांकडून दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी आपली समस्या मांडण्यासाठी नेमके कोणाकडे जावे, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
याशिवाय, रस्ते विकास कामामध्ये अनेक ठिकाणी मंजूर तांत्रिक आराखड्यानुसार काम होत नसल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. काही भागांमध्ये अपूर्ण रुंदीकरण, निकृष्ट दर्जाचे साहित्य तसेच जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटींमुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, संबंधित जोड रस्त्यांच्या ठिकाणी तात्काळ मुरूम अथवा योग्य दर्जाचे साहित्य टाकून रस्ते सुरक्षित करण्यात यावेत. तसेच संबंधित कंत्राटदार कंपनी व जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.










