ठाण्यातील एका कार्यक्रमामध्ये योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केले. ‘साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात’, असे म्हणत बाबा रामदेव यांनी वाढ ओढवून घेतला आहे. त्यांच्या या विधानावर संताप व्यक्त केला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी बाबा रामदेव यांना काळे फासण्याची इशारा दिला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, महिलांनी काय घालायचे, काय नाही हा तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. बाबा रामदेव यांनी हे विधान अमृता फडणवीस यांच्या समोर केले आहे. अमृताताईंनी त्यांच्या सणकन कानाखाली ओढायला हवी होती. महिलांनी साडी, सलवार घालणे इथपर्यंत ठिक आहे. ते मान्य आहे. पण पुढचे विधान कितपत योग्य आहे? बाबा रामदेव खाली डोके आणि वर पाय करा. तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा नीट होईल, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
रामदेव बाबांना अक्कल नावाचा प्रकार नाही. त्यांचे हे विधान घाणेरडे आहे. या विधानाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. त्यामुळेच बाबा रामदेव पुण्यात आल्यावर त्यांना काळं फसणार आहे, अशा इशारा रुपाली ठोंबरे यांनी दिला. तसेच गृहखात्याने बाबा रामदेव यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत भाजपशी संबंधित लोक महिलांचा वारंवार अपमान करतात, असा आरोपही त्यांनी केला.
नक्की काय म्हणाले बाबा रामदेव?
ठाण्यातील हायलँड मैदानात योग शिबीर आणि महिलांचे महासंमेलन अशा दोन कार्यक्रमांचे ठाण्यामध्ये आयोजन करण्यात आले होते. योगासनांसाठी महिलांनी सलवार कमीज परीधान केली होती आणि महासंमेलनासाठी त्यांनी सोबत साड्या आणल्या होत्या. मात्र योगा शिबीर आणि महासंमेलनाच्या दरम्यान अवधी न मिळाल्याने महिलांना सलवार कमीज ऐवजी साड्या परीधान करता आल्या नव्हत्या. याबाबत बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात. आणि माझ्या नजरेने काही घातलं नाही तरी चांगल्या दिसतात. बाबा रामदेव यांच्या या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे आणि अमृता फडणवीसही उपस्थित होत्या.











